मुंबई : गेल्या 2-3 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणारं शहापूर तालुक्यातील मोडक सागर धरण ओव्हर फ्लो झालं आहे. धरण ओव्हर फ्लो झाल्याने धरणाचे 2 दरवाजे उघडण्यात आले आहेत.

मोडक सागर धरणातून मुंबईला दररोज 455 दशलक्ष लीटर पाणीपुरवठा होतो. हे धरण ओव्हर फ्लो झाल्याने धरणाचे दोन दरवाजे उघडण्यात आले आहेत. त्यामुळे वैतरणा नदी काठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

याशिवाय मध्य वैतरणा धरणही ओव्हर फ्लो झाला आहे. या तलावापाठोपाठ मुंबईतील विहार तलावही लवकरच भरून वाहण्याच्या मार्गावर आहे.

दुसरीकडे सततच्या पावसामुळं नाशिक शहराला पाणीपुरवठा करणारे गंगापूर धरण 72 टक्के भरले आहे. पावसाचा जोर कायम असल्यानं आज सकाळी आठ वाजता गंगापूर धरणातून 2000 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. त्यामुळं नदीकाठच्या रहिवाशांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे