(Source: ECI/ABP News/ABP Majha)
लोकल सुरु करण्यासाठी मनसेचा सविनय कायदेभंग, संदीप देशपांडेंचा लोकल प्रवास!
मुंबईतील लोकल सेवा सुरु करण्यासाठी मनसेच्या सविनय कायदेभंग आंदोलनाला सुरुवात झाली आहे. रेल्वेने बजावलेली नोटीस धुडकावून मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी लोकलमधून प्रवास केला. तर ठाण्यात मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश देशपांडे यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं.
मुंबई : मुंबईतील लोकल सेवा सर्वसामान्यांसाठी सुरु करण्यासाठी मनसेच्या सविनय कायदेभंग आंदोलनाला सुरुवात झाली आहे. मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी आज (21 सप्टेंबर) सकाळीच लोकलमधून विनापरवानगी लोकल प्रवास केला. तर ठाणे स्टेशनवर मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना लोकल प्रवास करण्याआधीच पोलिसांनी अडवलं आणि कार्यकर्त्यांसह ताब्यात घेतलं. ठाण्यात पोलिसांचा मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
याशिवाय नवी मुंबईत मनसेचे उपशहराध्यक्ष निलेश वानखेडे यांच्या ऐरोली मनसे विभाग कार्यकर्त्यांनी वाशी ते ठाणे असा लोकल प्रवास पूर्ण केला. यादरम्यान रबाळे पोलिसांनी ऐरोली स्थानकात काही कार्यकर्त्यांना ताब्यात घतलं.
मात्र सविनय कायदेभंगाच्या इशाऱ्यानंतर मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांना रेल्वे पोलिसांनी नोटीस पाठवली आहे. दादर रेल्वे पोलिस स्टेशन आणि मुंबई सेंट्रल रेल्वे पोलिसांनी संदीप देशपांडे यांना ही नोटीस पाठवली आहे. शिवाय, रेल्वेने प्रवास केल्यास कायदेशीर कारवाई करणार असल्याचं या नोटीसमध्ये सांगण्यात आलं. परंतु तरीही संदीप देशपांडे यांनी काही कार्यकर्त्यांसह लोकलमधून प्रवास केला.
लोकल सेवा सुरु करा नाहीतर सविनय कायदेभंग करावा लागेल, असा इशारा मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी काही दिवसांपूर्वी दिला होता. ते म्हणाले की, "नोकरदार कल्याण-डोंबिवलीवरुन तीन-तीन तास प्रवास करुन ड्युटीवर जात आहेत, हे सरकारला दिसत नाही. लवकरात लवकर लोकल सुरु करण्याचा निर्णय घ्या नाहीतर मनसे सविनय कायदेभंग आंदोलन करेल. तिकीट न काढता मी लोकलने प्रवास करेन. कारण जर सरकारला हे कळत नसेल, सर्वसामान्यांचा त्रास दिसत नसेल तर आम्हाला सरकारचे लक्ष वेधावे लागणार आहे."
आम्ही आंदोलनावर ठाम : संदीप देशपांडे नोटीस जरी पाठवली तरी आम्ही आंदोलन करण्यावर ठाम असल्याचं संदीप देशपांडे यांनी सांगितलं. शिवाय आम्ही आमच्या भूमिकेत सरकारमध्ये बसलेल्या राजकीय पक्षासारखा यू-टर्न घेत नसून भमिकेवर ठाम असल्याचं ते म्हणाले.
मनसेच्या आंदोलनाला रेल्वे प्रवासी संघाचा पाठिंबा मनसेच्या सविनय कायदेभंग आंदोलनाला आता रेल्वे प्रवासी संघाने पाठिंबा दर्शवला आहे. सध्या ठाण्यापुढील डोंबिवली ते कर्जत कसारा मार्गावरील लाखो प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे मनसेच्या आंदोलनाला आमचा पाठिंबा आहे. शिवाय आम्ही आंदोलनात उतरु असंही प्रवासी महासंघाचे संस्थापक अध्यक्ष मनोहर शेलार यांनी म्हटलं आहे.
याबाबत बोलताना शेलार म्हणाले की, रेल्वे प्रशासन आणि महाराष्ट्र सरकारमधे कोणताही समन्वय नाही. राज्य सरकारने रेल्वे प्रवाशांचा केलेला अपेक्षाभंग यामुळे मनसेच्यावतीने आज सविनय कायदेभंग आंदोलनाला आम्ही पाठिंबा देत आहोत. सरकारी आणि खासगी कार्यालयातील कर्मचाऱ्यांची उपस्थिती वाढवण्यापूर्वी जादा बस आणि लोकल फेऱ्यांची संख्या वाढवायला हव्या होत्या. मात्र याबाबत महाराष्ट्र सरकार पूर्णपणे निष्क्रीय ठरले आहे. सध्याची लोकल सेवा फक्त सरकारी कर्मचाऱ्यांना आहे. तरीही कर्जत आणि कसारा मार्गावर या लोकल बारा रेल्वे स्थानकांवर न थांबवण्याचा मूर्खपणा राज्य सरकारने केला आहे. कोरोना पार्श्वभूमीवर मुंबई महानगर क्षेत्रातील कार्यालयांच्या वेळा बदलण्याचा निर्णयही सरकारने अद्याप घेतला नाही. त्यामुळे आम्ही या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे.