मुंबई : राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना सध्या आमनेसामने आलेलं पाहायला मिळतात. मशिदीवरील भोंगे आणि हनुमान चालीसा वादानंतर आता मनसेने मुंबईतील दादर परिसरातील शिवसेना भवन तसंच शिवाजी पार्क परिसरात पोस्टर लावले आहेत. या पोस्टरमध्ये मनसेने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना उद्देशून मजकूर लिहिला आहे. यामध्ये राज ठाकरेच बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा चालवत असल्याचं म्हटलं आहे.


पोस्टरवर काय लिहिलंय?
माननीय बाळासाहेब, 
बघा आपले सुपुत्र मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे हिंदू असून हनुमान चालीसा म्हणायला बंदी घालताहेत. यासाठी हिंदूंनी लावलेले भोंगे काढताहेत. आपला ठाकरी बाणा आणि वारसा खऱ्या अर्थाने फक्त आता मा. राज ठाकरे चालवत आहेत... जमल्यास उद्धवजींना हिंदूंबाबत सुबुद्धी द्या.


सुरक्षारक्षकांनी पोस्टर हटवले
दरम्यान, शिवसेना भवनाच्या सुरक्षारक्षकांनी मनसेने लावलेले पोस्टर हटवले आहेत. शिवाजी पार्कवरील 2 एप्रिल रोजी गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे म्हणाले होते की, "मशिदींवर एवढ्या मोठ्या आवाजात भोंगे का लावतात? मशिदीवरील भोंगे खपवून घेणार नाही. ज्या मशिदीबाहेर भोंगा दिसेल, त्याच्या समोर दुप्पट स्पीकर लावून हनुमान चालीसा लावणार."


राज ठाकरेची मागणी हा भाजपच्या अजेंड्याचा भाग : सरकार
राज ठाकरे याच्या या मागणीचा भाजपने समर्थन केलं आहे. या संदर्भात विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले री, अशा मागण्या हा भाजपच्या अजेंड्याचा भाग आहे. भाजप शेजारच्या कर्नाटक आणि इतर राज्यांमध्येही हा मुद्दा उपस्थित करत आहे. लोकांमध्ये बेचैनी निर्माण करुन हिंदू मतदारांचं ध्रुवीकरण करण्यासाठी अशाप्रकारच्या मागण्या केल्या जातात


राज ठाकरेंच्या टिप्पणीवर पक्षाचे मुस्लीम नेते नाराज
दरम्यान, राज ठाकरे यांनी भाषणात मशिद आणि मदरशांबाबत केलेल्या टिप्पणीवर मनसेच्याच पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे उपाध्यक्ष शाबाज पंजाबी यांनी राजीनामा दिला आहे. यानंतर मागील दोन दिवसात मनसे पक्ष सोडणाऱ्यांची संख्या दोन झाली आहे. पंजाबी म्हणाले की, "मुस्लीम समुदायातील अनेक लोक माझ्या परिसरात राहतात. माझे त्यांच्यासोबतचे संबंध चांगले आहेत. भोंगे आणि मदरशांबाबत राज ठाकरे यांचं वक्तव्य चुकीचं आहे. तर पुण्यात मनसेचे शाखाप्रमुख मजीद शेख यांनी सोमवार (4 एप्रिल) राजीनामा दिला होता.


संबंधित बातम्या