मुंबई : मुंबईच्या दादरमधील शिवाजी पार्क परिसरात मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यासमोर मनसेकडून पोस्टरबाजी करण्यात आली आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर दादर परिसरात मनसेने बॅनरबाजी केलेली पाहायला मिळत आहे. राज ठाकरे 5 जून रोजी अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत.
या बॅनरवर राज ठाकरे यांच्या भगवाधारी फोटो पाहायला मिळतो. तसंच 'राज तिलक की करो तैयारी, आ रहे हैं भगवाधारी', असाही उल्लेख बॅनरवर करण्यात आला आहे. तसंच 'चला अयोध्येला, आम्ही चाललोय तुम्हीही चला,' असंही बॅनरवर लिहिल्याचं पाहायला मिळतं. एकंदरीतच मनसेकडून राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर लोकांनांही अयोध्येला येण्यासाठी बॅनरच्या माध्यमातून आवाहन करण्यात आलं आहे.
यापूर्वी महाराष्ट्रात मराठी माणूस आणि मराठीच्या मुद्द्यावरुन राजकारण करणारे राज ठाकरे आता हळूहळू हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावर येत आहेत. त्यामुळे आतापर्यंत हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावरुन राजकारण करणाऱ्या शिवसेनेसाठी पर्याय बनण्याची रणनीती आखत असल्याचं म्हटलं जात आहे.
5 जून रोजी राज ठाकरे अयोध्या दौऱ्यावर जाणार
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात अयोध्येला जाणार असल्याचे जाहीर केले होते. पण त्यावेळी त्यांनी तारीख सांगितली नव्हती. पुणे दौऱ्यावर असताना राज ठाकरे यांनी रविवारी (17 एप्रिल) पत्रकार परिषदेत याबाबत घोषणा केली. 5 जून रोजी राज ठाकरे अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. या अयोध्या दौऱ्यात कार्यकर्ते देखील मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. कार्यकर्त्यांना अयोध्येत जाण्यासाठी मनसेकडून ट्रेन बुक करण्यात येणार आहे. 10 ते 12 ट्रेन बुक करण्यात येणार असल्याचं समजतं.
अयोध्या दौऱ्यासाठी मनसे 10 ते 12 ट्रेन बुक करणार
राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यासाठी मनसे कार्यकर्तेही उत्सुक आहेत. या अयोध्या दौऱ्यात कार्यकर्ते देखील मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. कार्यकर्त्यांना अयोध्येत जाण्यासाठी मनसेकडून ट्रेन बुक करण्यात येणार आहे. यासाठी मुंबई, पुणे, ठाणे, रायगड, नाशिक, नागपूर या ठिकाणाहून 10 ते 12 ट्रेन बुक करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.
Raj Thackeray Maha Aarti : भगवा शेला, हाती गदा, पुण्यात राज ठाकरेंच्या हस्ते हनुमानाची महाआरती