Mumbai Local Trains :  राज्य सरकारने सर्व कोविड निर्बंध (Covid Restrictions) हटविले आहेत, याबाबत रेल्वेने रविवारी सांगितले की, त्यांनी लसीकरणाशी संबंधित पर्याय आपल्या तिकीट अॅपमधून हटविला आहे. आतापर्यंत, केवळ पूर्ण लसीकरण झालेल्या नागरिकांनाच लोकल ट्रेनमधून प्रवास करण्याची परवानगी होती. मात्र आता निर्बंध हटविल्यामुळे प्रवाश्यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. तर काही लोकांमध्ये याबाबत नाराजी दिसून येत आहे.


लस प्रमाणपत्रे तिकीट अॅपशी लिंक करण्याची आवश्यकता नाही
निर्बंध उठवण्याच्या राज्य सरकारच्या निर्देशांनुसार, रेल्वेने सर्व निर्बंध उठवले आहेत आणि मुंबईतील रेल्वेसाठी काउंटरवर आणि अॅपवर सर्वांसाठी तिकीट सुविधा सुरू केली आहे. याचा अर्थ प्रवाशांना आता त्यांची लस प्रमाणपत्रे तिकीट अॅपशी लिंक करण्याची आवश्यकता नाही. यासंबंधित सर्व सूचना आता मागे घेण्यात आल्या आहेत,” असे रेल्वेच्या प्रवक्त्याने सांगितले. एका रेल्वे अधिकाऱ्याने सांगितले की, सर्व अधिकृत प्रवेश-एक्झिट गेट्स, लिफ्ट्स, एस्केलेटर, कोरोना महामारीच्या काळात बंद केलेले फूट ओव्हरब्रिज, सर्व व्यावसायिक तिकीट काउंटर आणि बुकिंगसाठी एटीव्हीएम मशीन आता उघडल्या जातील. दरम्यान, मुंबई लोकल ट्रेनची तिकिटे आणि पास फक्त दोनदा लसीकरण झालेल्या नागरिकांसाठी उपलब्ध होते आणि ते राज्य सरकारच्या पोर्टलद्वारे लसीकरण प्रमाणपत्र आणि युनिव्हर्सल पासशी जोडले जाणे आवश्यक होते. याला विरोध करत, नागरिकांच्या एका गटाने उच्च न्यायालयातही धाव घेतली होती, ज्याने गेल्या महिन्यात राज्याला फटकारले होते, तसेच आपली भूमिका स्पष्ट करण्यास सांगितले होते. 


दैनंदिन प्रवासी संख्या जवळपास 65 लाखांवर पोहोचली


महाराष्ट्रातील कोविड प्रकरणांमध्ये घट झाल्याचे सांगत राज्य सरकारने नुकतेच 1 एप्रिलपासून सर्व निर्बंध हटवण्याचा निर्णय घेतला. ताज्या आकडेवारीनुसार, मुंबई उपनगरीय गाड्यांवरील दैनंदिन प्रवासी संख्या जवळपास 65 लाखांवर पोहोचली आहे. मध्य रेल्वेवर सुमारे 35 लाख आणि पश्चिम रेल्वेवर 29 लाखांहून अधिक प्रवासी प्रवास करत आहेत. महामारीच्या आधी असलेल्या प्रवाश्यांची ही आकडेवारी 15 लाख कमी आहे. जोगेश्वरी येथील ज्येष्ठ नागरिक प्रवासी समितीचे सदस्य 62 वर्षीय मन्सूर उमर दरवेश यांनी सप्टेंबर 2021 मध्ये मुख्यमंत्री कार्यालय आणि रेल्वे अधिकाऱ्यांना पत्र लिहले, ज्यामुळे वादाला तोंड फुटले होते. 


रेल्वेलाही जवळपास 1000 कोटींचा तोटा


दरम्यान राज्य सरकारकडून कोरोनाचे सर्व निर्बंध हटविण्यात आल्यामुळे मुंबईकरांसाठी ही आनंदाची बातमी आहे. रेल्वेच्या तिकिटावर अशा निर्बंधांमुळे सर्वसामान्यांना याचा त्रास सहन करावा लागला. तसेच रेल्वेलाही त्यांच्या महसुलात जवळपास 1000 कोटींचा तोटा झाला आहे आणि या सगळ्याचा बोजा पुढील अर्थसंकल्पात प्रवाशांवर नक्कीच पडेल असे सांगण्यात येत आहे.