मुंबई : मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी काही दिवसांपुर्वी पत्रकार परिषद घेऊन सध्या मुंबई महापालिकेत तात्पुरत्या स्वरूपात करण्यात आलेल्या रुग्णालयात भ्रष्टाचार झाल्याच आरोप केला. शिवाय या भ्रष्टाचाराला जबाबदार पेंग्विन गँग असल्याचं देखील संदीप देशपांडे यांनी म्हटलं होतं. यासोबतचं महापालिकेतील वेगवेगळी कंत्राट कशापद्दतीने शिवसेनेच्या लोकांना दिली जात आहेत. यामध्ये वरुण सरदेसाई यांचा समावेश ही असल्याचा आरोप संदीप देशपांडेंनी केला होता. हिच बाब अधोरेखित करत वरुण सरदेसाई यांच्याकडून संदीप देशपांडे यांना मानहानीची नोटीस पाठवण्यात आली आहे. याला उत्तर देताना संदीप देशपांडे यांनी आम्ही असल्या धमक्यांना घाबरत नाही. जिथे भ्रष्टाचार दिसेल तिथे लाथ मारणारच अशा आशयाचं ट्वीट केलं आहे.

Continues below advertisement

संदीप देशपांडे यासंदर्भात बोलताना म्हणाले की, 'काही दिवसांपुर्वी मी पत्रकार परिषद घेऊन जाहीर केलं होतं की, कोरोना बाधित रुग्णांपासून होणारा संसर्ग रोखणे आणि बाधित रुग्णांवर योग्य आणि चांगले उपचार करणं महापालिकेचं काम आहे. परंतु सध्याच्या कठीण काळात मुंबई महानगर पालिकेकडून करोडो रुपयांचा भ्रष्टाचार करण्यात येतं आहे. आणि यामागे पेंग्विन गँग आहे. उदाहरण द्यायचं झालं तर, सध्या मुंबईत जी अल्प काळासाठी मोठ्या प्रमाणावर कोविड सेंटर बनवण्यात आली आहेत. त्यामध्ये देण्यात आलेल्या सोयीसुविधांवर लाखोंचं भाडं आकारण्यात आलं आहे. कोविड सेंटरमध्ये जे पंखे लावण्यात आले आहेत. त्यातील एका पंख्याचे दिवसाला 100 रुपये इतकं भाडं आहे. मागील 90 दिवसांचा विचार केला तर एकुण खर्च एका पंख्याचा 9 हजार रुपये इतका येतो. यामध्ये नवीन पंखा विकत घेता आला असता. धक्कादायक बाब म्हणजे, ही कामं करत असताना कोणत्याही प्रकारे टेंडर न काढता आपल्या जवळच्या लोकांच्या बगलबच्चांना याची कंत्राटे वाटण्यात आली आहेत. यामध्ये वरुण सरदेसाईंचा देखील समावेश आहे. या पत्रकार परिषदेनंतर वरुण सरदेसाई यांनी त्यांच्या वकिलांच्या मार्फत आम्हांला मानहानीची नोटीस पाठवली आहे. परंतु आम्ही आमच्या आरोपांवर ठाम आहोत. आम्ही असल्या धमक्यांना घाबरत नाही. ज्या ठिकाणी भ्रष्टाचार दिसेल तिथे लाथ मारणारच, असं त्यांनी स्पष्ट केलं. तसेच याचं पत्रकार परिषदेत संदीप देशपांडे यांनी महापालिकेतील शव पिशव्या खरेदीतील भ्रष्टाचार देखील समोर आणला होता. या प्रकरणात कशा पद्धतीने शवपिशव्या खरेदीत मराठी व्यवसायिकांना डावलण्यात आलं हे देखील देशपांडे यांनी उघडकीस आणलं होतं.

Continues below advertisement

वरुण देसाईंकडून संदीप देशपांडे यांना नोटीस 

वरुण सरदेसाई यांच्या वकिलांकडून आलेल्या नोटिसमध्ये नमूद करण्यात आले आहे की, संदीप देशपांडे यांनी पत्रकार परिषद घेऊन वरुण देसाईंवर आरोप केला आहे की, महापालिकेला वैद्यकीय सामुग्री पुरवणाऱ्या 27 कंत्राटदारांना कसल्याही प्रकारचा अनुभव नसताना त्यांना सामुग्री पुरवण्याचे कंत्राट देण्यात आले आहे आणि यामागे वरुण देसाईं आहेत. ही बाब पूर्णपणे खोटी आहे. संदीप देशपांडे यांनी ही खोटी माहिती आपल्या सोशल मीडियातून पुढील 48 तासात काढावी. यासोबतच झालेल्या बदनामीसाठी आमची माफी मागावी अथवा त्यांच्यावर मानहानी केल्याच्या आरोपपाखाली कायदेशीर कारवाई केली जाईल.

महत्त्वाच्या बातम्या : 

मास्क वापरा.. अन्यथा १ हजार रुपये दंड भरा! मुंबई महापालिकेकडून परिपत्रक जारी

राज्यात 31 जुलैपर्यंत लॉकडाऊनच; मिशन बिगीन अगेनचे जूनमधील नियम कायम

ठाण्यात लॉकडाऊनबाबत संभ्रमावस्था कायम, प्रशासनाकडून अधिकृत घोषणा नाही

मुंबईकरांनो, आवश्यक असेल तरच घरापासून दोन किलोमीटरच्या आतच फिरा; अन्यथा कारवाई होणार