मुंबई : राज्यात एक जुलैपासून "मिशन बिगीन अगेन"च्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात होणार आहे. राज्य सरकार टप्प्या टप्प्याने राज्यातील निर्बंध शिथील करत आहे. मात्र, 31 जुलैपर्यंत ज्यात सध्या आहे तेच नियम लागू असणार आहेत. कोरोनाबाधित रुग्णांची सर्वाधिक संख्या असलेल्या मुंबईत पोलिसांकडून नियमावली जारी केल्याचा एक मेसेज सध्या व्हायरल होत आहे. परंतु हा मेसेज खोटा असल्याचं मुंबई पोलिसांकडूनच सांगण्यात आलं आहे.


मुंबई पोलिसांनी ट्वीट करुन यासंदर्भात माहिती दिली आहे. ट्वीटमध्ये पोलिसांनी म्हटलं आहे की, "आम्ही मुंबईकरांना सांगू इच्छितो की, संबंधित मार्गदर्शक सूचना मुंबई पोलिसांनी जारी केलेल्या नाहीत. नागरिकांनी यावर विश्वास ठेवू नये आणि हा मेसेज मित्रांना किंवा कुटुंबांतील सदस्यांना फॉरवर्ड करु नय. कोणत्याही माहितीसाठी केवळ अधिकृत सूत्रांवरच विश्वास ठेवा #Dial100"





मुंबई पोलिसांच्या नावाने व्हायरल होत असलेली खोटी नियमावली!


1. मेडिकल वगळता अत्यावश्यक वस्तूंची दुकानं सकाळी 9 ते संध्याकाळी 5 पर्यंत सुरु राहतील.


2. अत्यावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी केवळ एकाच व्यक्तीला जाण्याची परवानगी. एकापेक्षा जास्त व्यक्ती असल्यास त्याला अटक केली जाईल.


3. खरेदी करण्यासाठी घराबाहेर पडल्यास तुमच्यासोबत पत्त्याचा पुरावा असलेलं कागदपत्र ठेवा, जसं की आधार कार्ड आणि ड्रायव्हिंग लायसन्स


4. जर दुकान दोन किमी परिसरात असेल तर चालत जा


5. कोणीही वस्तूंच्या खरेदीसाठी कोणी वाहनाचा वापर करताना आढळलं तर वाहन जप्त केलं जाईल. (जवळच्या दुकानातूनच खरेदी करावं, असं सरकारचं मत आहे)


6. कारणाशिवाय घराबाहेर पडू नये


7. जर तुम्ही घराजवळच्या दुकानातूनच वस्तू ऑर्डर करत असाल आणि त्याची होम डिलिव्हरी होत असेल तर डिलिव्हरी बॉयला खरे कागदपत्रे आणि हेल्मेट बाळगायला सांगा


8. वस्तू खरेदी करताना एकमेकांपासून किमान पाच फुटांचं अंतर ठेवा. या नियमाचं उल्लंघन करताना कोणी आढळलं तर त्याच्यावर गुन्हा दाखल केला जाईल.


9. गृहनिर्माण सोसायटी आणि जवळच्या परिसरात फिरण्यासही परवानगी नाही.


10. बाहेर फिरताना तुमचं वाहन सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालं तर उल्लंघन केल्याप्रकरणी ताब्यात घेतलं जाईल.


11.जर कोणी ज्येष्ठ नागरिक घरात एकटेच राहत असतील तर मुंबई पोलिसांना 18002002122 या क्रमांकावर फोन करा.


वरील मेसेज खोटा असून मुंबई पोलिसांनी अशी कोणतीही नियमावली जारी केलेली नाही, असं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे. तसंच यावर विश्वास न ठेवण्याचं आवाहनही केलं आहे.