(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Shivaji Maharaj Samadhi: 'लोकमान्य टिळकांनी शिवरायांच्या समाधीसाठी निधी जमवला, पण...'
Shivaji Maharaj Samadhi: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीच्या जीर्णोद्धारासाठी 25 वर्ष निधी जमवला मात्र तो त्यांच्या हयातीत खर्च झाला नसल्याचा दावा इतिहास संशोधकांनी केला.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी औरंगाबाद येथे केलेल्या भाषणाचे पडसाद उमटू लागले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांची रायगडावरील समाधी लोकमान्य टिळक यांनी बांधली असल्याचे राज यांनी म्हटले. त्यांच्या या वक्तव्यावर तीव्र प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. राज ठाकरे यांच्या या दाव्यावर इतिहास अभ्यासकांसह राजकीय नेत्यांनीही टीका केली आहे.
टिळकांनी 25 वर्ष निधी जमवला पण...
इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी सांगितले की, लोकमान्य टिळक यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीच्या जीर्णोद्धारासाठी निधी जमा करण्यास सुरुवात केली. यासाठी त्यांनी राजर्षी शाहू महाराजांकडे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीचे जीर्णोद्धार करण्यासाठी निधी मागितला होता. त्याबाबतचे तसे पत्र असल्याचेही इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी सांगितले. छत्रपती शाहू महाराजांनी टिळकांच्या या निधीला भरघोस मदतही दिली असल्याचे सावंत यांनी म्हटले.
शिवाजी समाधीचे जीर्णोद्धार झाला तो 1925-26 मध्ये आणि लोकमान्य टिळकांचे निधन 1920 ला झाले. टिळकांनी 1895 पासून निधी जमवण्यास सुरुवात केली. त्यावेळी 25 वर्षात हजारो रुपये जमवले. पण एकही पैसा समाधीवर खर्च केला नसल्याचा दावा सावंत यांनी केला. छत्रपती संभाजी महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी बांधली. या समाधीची नोंद ब्रिटीश अधिकारी, अभ्यासकांच्या नोंदीत आहे. फोटो, रेखाचित्र उपलब्ध असल्याचेही सावंत यांनी सांगितले.
राज यांनी इतिहास तपासून बघावा
राज्याचे मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी राज ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडले. राज ठाकरेंनी लोकमान्य टिळक, पुरंदरे आणि रामदास स्वामी यांचे गुणगान गाण्यासाठी सभा घेतली होती असल्याचे भुजबळ यांनी म्हटले. शरद पवार यांना जातीयवादी ठरवण्यासाठी राज यांची सभा झाली असल्याचे त्यांनी म्हटले. छत्रपती शिवाजी महाराज आमच्या हृदयात आहे. या उलट राज ठाकरे हे शाहु, फुले आंबेडकर यांचे नाव का घेत नाही असा सवालही त्यांनी केला. राज ठाकरे यांनी मांडलेला इतिहास धादांत खोटा आहे. राज यांनी इतिहास तपासून बघावा असा सल्लाही भुजबळ यांनी राज ठाकरेंना दिला.
खोटा इतिहास सांगून वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न; प्रवीण गायकवाडांची टीका
सध्या राज्यात अस्वस्थ पसरली आहे. सध्या खोटा इतिहास सांगून वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न राज ठाकरे करत असल्याची टीका प्रवीण गायकवाड केली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी महात्मा ज्योतिबा फुले यांनी शोधली होती. लोकमान्य टिळकांनी जीर्णद्धार केला नाहीं. त्यांनी वर्गणी गोळा केली. आणि जीर्णोद्धार करणे बाजूला राहिला त्यांनी समाधी जवळ वाघ्या कुत्र्याचा पुतळा बसवला आणि वाद घडवून आणला असल्याचेही गायकवाड यांनी म्हटले. राज ठाकरे जातीयवादी राजकरण करत आहेत. राज ठाकरे यांना अटक करावी अशी आमची मागणी आहे. राज ठाकरे यांना अटक करून शांतता प्रस्तापित करण्याची मागणी प्रवीण गायकवाड यांनी केली.