मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर काल (शनिवार) लिलावती रुग्णालयात एक छोटी शस्रक्रिया पार पडली. शस्रक्रियेनंतर आज त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. डॉक्टरांनी राज ठाकरेंना सहा आठवडे आराम करण्याचा सल्ला दिला आहे, अशी माहिती शर्मिला ठाकरे यांनी दिली आहे. पायाच्या मसल टिशूमध्ये रक्त जमा झालं होतं. त्यामुळे होणारा दबाव कमी करण्यासाठी हॅमेटोमा ड्रेनेजची छोटी शस्त्रक्रिया केली गेली.
दरम्यान, शस्रक्रियेनंतर चालताना त्यांना काठीचा आधार घेत चालावं लागणार आहे. पायावरील ताण कमी व्हावा तसेच चालताना त्रास कमी व्हावा म्हणून त्यांना काठी देण्यात आली आहे. आज दुपारी 12 च्या सुमारास राज ठाकरे यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला. त्यानंतर ते थेट दादरच्या त्यांच्या निवासस्थानासमोरील अमित ठाकरेंच्या घरी विश्रांतीसाठी गेले आहेत.
राज ठाकरे यांच्या हाताला 11 जानेवारी 2021 रोजी फॅक्चर झालं होतं. टेनिस खेळताना त्यांना ही दुखापत झाली होती. ज्यात त्यांच्या हातासोबतच पायाला देखील दुखापत झाली होती. त्यामुळे त्यांना बसण्याचा त्रास जाणवत होता. तसेच प्रवास करताना देखील त्यांना अधिक त्रास जाणवू लागला होता. काल (10 एप्रिल) दुपारी 3 च्या सुमारास त्यांच्यावर यशस्वी शस्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रियेनंतर राज ठाकरे यांची प्रकृती ठणठणीत आहे. त्यांना काही दिवस आराम करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. डॉ. विनोद अग्रवाल, डॉ. आनंद उत्तुरे यांनी शस्त्रक्रिया केली आणि डॉ. जलील पारकर शस्रक्रियेदरम्यान उपस्थित होते.
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच चालला आहे. अशातच वाढत्या रुग्णसंख्येमुळे अनेक जिल्ह्यांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी राज यांच्याशी फोनवर चर्चा केली होती. "राज्यातील कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत लॉकडाऊनचा मार्ग स्वीकारावा लागू शकतो, त्यामुळे अशा परिस्थितीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सहकार्य करावं", असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी राज ठाकरेंना फोनवरील संवादात केलं होतं.