मुंबई : अँटिलिया प्रकरणाचा तपास सुरु झाल्यापासून नवनवीन माहिती समोर येत आहे. एनआयएच्या पथकाने आता सचिन वाझे यांचे निकटवर्तीय रियाझुद्दीन काझी यांना अटक केली आहे. रियाझुद्दीन काझी यांना एनआयएने काल रात्री 12.30 वाजता अटक केली. कोर्टाच्या हजेरीदरम्यान तो या प्रकरणातील सूत्रधार असून तपास यंत्रणेने कोठडीची मागणी केली होती. त्यानंतर, कोर्टाने त्याला 16 एप्रिलपर्यंत एनआयएच्या ताब्यात दिले आहे.
सुनावणीदरम्यान तपास यंत्रणेने कोर्टात सांगितले की 8 मार्च रोजी हे प्रकरण एनआयएकडे आल्यानंतर या लोकांनी पुरावे नष्ट करायला सुरुवात केली. एनआयएने म्हटले आहे की पुरावे नष्ट करत असताना काझी तिथे उपस्थित होता.
तपास एजन्सीचा युक्तिवाद
- एजन्सीने कोर्टाला सांगितले की या लोकांनी सीपीयू आणि डीव्हीआरची विल्हेवाट लावली. त्यावेळी रियाझुद्दीन काझी हे वाझे यांच्यासमवेत उपस्थित होता.
- एजन्सीने सांगितले की आम्हाला काही सीसीटीव्ही फुटेज सापडले आहेत ज्यात वाझे आणि काझी एकत्र दिसले होते. न्यायालयात कोठडी देण्याच्या मागणीसंदर्भात एनआयएने असा युक्तिवाद केला की चौकशी दरम्यान सचिन वाझे यांनी अर्धवट माहिती दिलीय. या संदर्भात अधिक माहितीसाठी मिळवण्यासाठी काझीची चौकशी करायची आहे. आम्हाला सीडीआर आणि आयपीडीआर मिळाले असून प्राप्त झाले असून आम्हाला याबद्दल काझीकडे चौकशी करावी लागेल.
- हे प्रकरण केवळ जिलेटिन किंवा मनसुख हिरण हत्या प्रकरणापर्यंत मर्यादित नाही. यासाठी पैसा कोणी दिले, जिलेटिन कुठून आले? याचीही माहिती मिळवायची आहे.
काझी यांच्या वकिलाचा युक्तिवाद
- कोठडीच्या मागणीचा काझी यांच्या वकिलांनी तीव्र विरोध केला. सुनावणीदरम्यान ते न्यायालयात म्हणाले की मी 20 दिवसांपासून एनआयएपुढे जात असून त्यांना सर्व माहिती दिली आहे. जेव्हा मला एनआयएकडून बोलावणं येतं तेव्हा हजर असतो. मी तपासात सहकार्य करीत आहे.
- काझी यांचे वकील म्हणाले की, 13 मार्च रोजी वाझे यांना अटक करण्यात आली होती. तेव्हा भारतीय पुरावा अधिनियम कलम 27 अंतर्गत काझी यांनी यात मदत देखील केली होती.
- न्यायालयात युक्तिवाद मांडत असताना वकिलाने सांगितले की, तपास करणार्या एजन्सीमार्फत माझ्या क्लायंटला बळीचा बकरा बनवले जात आहे. माझ्या क्लायंटला अल्प मुदतीची एनआयए कोठडी देण्यात यावी. दोन्ही युक्तीवाद ऐकल्यानंतर कोर्टाने 16 एप्रिलपर्यंत काझीला एनआयएच्या ताब्यात पाठवले आहे.