मुंबई : अँटिलिया स्फोटकं प्रकरण आणि मनसुख हिरण हत्येची चौकशी करणार्‍या एनआयएने एपीआय रियाझुद्दीन काझी यांना अटक केली आहे. काझी यांची या संपूर्ण प्रकरणात महत्वाची भूमिका असल्याचा आरोप आहे. या प्रकरणात पुरावे मिटवणे, प्रकरणाची माहिती असून देखील सहकार्य केल्याचा आरोप एनआयएने केला आहे.


रियाझुद्दीन काझी यांच्यावरील आरोप?


एनआयएच्या सूत्रांनी सांगितले की एपीआय़ रियाझुद्दीन काझी यांना सचिन वाझे यांनी केलेल्या सर्व गुन्हाची त्यांनी माहिती होती आणि त्यांची अटक महत्त्वाची असल्याचे सांगितले जात आहे.


आरोप क्रमांक 1


अँटिलिया स्फोटक प्रकरणातील तपासाचा हवाला देत काझी यांनी 26 फेब्रुवारी रोजी ठाणे येथे असलेल्या साकेत सोसायटीत जाऊन तेथील सीसीटीव्ही फुटेज आपल्या ताब्यात घेतले होते आणि ते मिटवले होते. 17 फेब्रुवारी रोजी मनसुख हिरणची स्कॉर्पिओ गाडी विक्रोळीहून घेतल्यानंतर ती साकेत सोसायटीत आणण्यात आली होती. हीच गोष्ट तपास यंत्रणांना लक्षात येऊ नये म्हणून तेथील सोसायटीतील सीसीटीव्ही फुटेज मिटवण्यात आले. इतकेच नाही तर पंचममध्येही डीव्हीआरचा उल्लेख नव्हता. साकेत सोसायटीच्या लोकांनी त्यांच्या स्थानिक पोलिस ठाण्यात ही माहिती दिली तेव्हा ही बाब उघडकीस आली.


आरोप क्रमांक 2


काझी यांनी साकेत सोसायटीचे डीव्हीआर घेतल्यानंतर ठाण्यात असलेल्या मनसुखच्या कार्यालयाजवळील नंबर प्लेट बनवणाऱ्या दुकानातील डीव्हीआर देखील ताब्यात घेतले.


आरोप क्रमांक 3


त्यानंतर रियाझुद्दीन काझी विक्रोळीच्या कन्नमवार नगर भागात असलेल्या बंटी रेडियम शॉपवर गेले आणि त्या दुकानातील डीव्हीआरही ताब्यात घेतले. त्यानंतर एनआयएने तपासादरम्यान मिठी नदीत शोध घेतला असता तेथे अनेक डीव्हीआर, एक लॅपटॉप व सीपीयू जप्त करण्यात आले, असं सांगितलं जात आहे. रियाझुद्दीन काझी यांनी डीव्हीआर ताब्यात घेतले आणि आणि नंतर ते नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता.


आरोप क्रमांक 4


एनआयएच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, ही केस एटीएसकडून ताब्यात घेताना माहिती मिळाली की, 6 मार्च रोजी सचिन वाझे आणि रियाझुद्दीन काझी ऑडी गाडीत बसून मुंबईच्या नागपाडा भागात गेले होते. नागपाडा येथे जाताना दोघांनी एका व्यक्तीची भेट घेतली जो वाझे यांच्या ओळखीचा होता.  त्यांनी या व्यक्तीकडून पेट्रोल व हातोडा घेतला होता.


रियाझुद्दीन काझी कोण आहेत?


एपीआय रियाझुद्दीन काझी हे 2010 साली एमपीएससीमधून भरती झाले होते. त्यांची पहिली पोस्टिंग वर्सोवा पोलीस स्टेशनमध्ये पीएसआयच्या पोस्टवर झाली. जेथे त्यांनी प्रोबेशन पीरियडवर काम केले. वर्सोवा पोलिस स्टेशनमध्ये काही वर्षे काम केल्यावर त्यांची अँटी चेन स्नॅचिंग स्कॉडमध्ये बदली झाली. त्यानंतर रियाझुद्दीन यांना सीआययूमध्ये पाठवण्यात आलं. मात्र अँटिलिया प्रकरणात नाव अल्यानंतर त्यांची सीआययूमधून बदली करण्यात आली.