मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आता राज्य सरकारच्या कारभारावरही लक्ष ठेवण्याचा निर्धार केलेला दिसत आहे. दुपारच्या सत्रात मनसे नेते नितीन सरदेसाई शॅडो कॅबिनेटची घोषणा करणार आहेत. शॅडो कॅबिनेट म्हणजे मनसेचा प्रत्येक नेता सरकारच्या प्रत्येक खात्यावर लक्ष ठेवणार, काम व्यवस्थित सुरु आहे हे पाहणार आणि घोटाळा झाल्यास तो बाहेर काढणार. त्यामुळे विधानसभेला भाजपविरोधात राहून आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाजूने प्रचारसभा घेणारे राज ठाकरे आता महाराष्ट्र विकास आघाडी सरकारवर निशाणा साधण्याच्या तयारीत दिसत आहेत.


दरम्यान, टोल नाक्यांवर मनसेने आपली शॅडो कॅबिनेट बसवली होती काय झालं हे आपल्या सर्वांना माहित आहे, अशा शब्दात शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी मनसेवर टीका केली आहे.

शॅडो कॅबिनेट म्हणजे काय?
शॅडो कॅबिनेट म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर विरोधकाचं मंत्रिमंडळ. कोणत्याही पंतप्रधानांचं किंवा मुख्यमंत्र्याचं जसं मंत्रिमंडळ असतं तसंच मंत्रिमंडळ विरोधी पक्षांकडून स्थापन केलं जातं. या मंत्र्यांना सत्ताधारी मंत्र्यांप्रमाणे कोणतेही अधिकार नसले तरी त्यांनी सत्ताधारी मंत्र्यांवर आपल्या अभ्यासाने वचक ठेवणं अपेक्षित असतं. थोडक्यात सरकारच्या कामकाजवर लक्ष ठेवण्यासाठी देखरेख ठेवण्यासाठी शॅडो कॅबिनेट या संकल्पनेचा वापर केला जातो. ही पाश्चिमात्य देशातली संकल्पना आहे. राज्यशास्त्रात या संकल्पनेला खूप महत्वाचं स्थान देण्यात आलं आहे.

विरोधकांनी स्थापन केलेल्या शॅडो कॅबिनेटमध्ये सत्ताधारी गटाने जी लोकोपयोगी खाती किंवा विभाग तयार केलेले असतात, त्या विभागाचे, विषयाचे जाणकार किंवा तज्ञ असावेत अशी अपेक्षा असते. म्हणजे सरकारच्या संबंधित खात्याच्या एखाद्या मंत्र्याने एखादा निर्णय घेतला तर त्याचं योग्य विश्लेषण करण्याची शॅडो कॅबिनेटमधील मंत्र्यांची क्षमता असावी हे अपेक्षित असतं. शॅडो कॅबिनेटमधील मंत्र्यांना शॅडो मंत्री म्हटलं जातं. त्यांच्या विश्लेषणाला किंवा टिका टिपणीला सत्ताधारी मंत्र्यांइतकंच स्थान प्रसारमाध्यमांमध्ये मिळतं. शॅडो कॅबिनेटचा प्रमुख म्हणजे संबंधित सरकारमधील विरोधी पक्षनेता असतो.

2014 च्या सार्वत्रिक निवडणुकांनंतर केंद्रात मोदी सरकार सत्तेत आलं तेव्हा विरोधी पक्षनेतेपद ही न मिळालेल्या काँग्रेसने शॅडो कॅबिनेट स्थापन करण्याची घोषणा केली होती. काँग्रेसने अनेक टर्म संबंधित खात्याचं मंत्रिपद भूषवलेल्या तसंच त्या त्या विषयातील जाणकार असलेल्या ज्येष्ठ नेत्यांची समिती जाहीर करत शॅडो कॅबिनेटची घोषणा केली होती. मात्र आपल्याकडे नेत्यांना सरकारच्या प्रत्येक विषयात मत द्यायचं असल्यामुळे काँग्रेसने मोठ्या अपेक्षेने केलेला हा प्रयोग फारसा चर्चेत आला नाही. 2019 च्या निवडणुकांपूर्वी केंद्रातल्या मोदी सरकारविरुद्ध राज्याराज्यातल्या विरोधी पक्षांची एकजूट पश्चिम बंगालमध्ये करण्याचा प्रयत्न झाला. त्यासाठी मोदी सरकारचे देशभरातले विरोधक एकवटले होते. त्या वेळी झालेल्या जाहीर सभेतही शॅडो कॅबिनेट स्थापन करुन केंद्रांच्या धोरणांचा मुद्देसूद विरोध करण्याचा निर्णय झाला होता. मात्र हा प्रयोगही घोषणेप्रमाणेच अल्पायुषी ठरला.

मनसेचा ध्वज बदलला
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने अखेर आपला ध्वज बदलला आहे. मुंबईत गोरेगावमधील नेस्को मैदानात मनसेचं पहिलं राज्यव्यापी अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनाचं उद्घाटन झाल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नव्या ध्वजाचं अनावरण केलं. मनसेच्या नव्या झेंड्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची राजमुद्रा आहे. तसंच झेंड्यात पूर्णपणे भगव्या रंगाला स्थान देण्यात आलं आहे. स्थापनेनंतर तब्बल 14 वर्षांनी मनसेच्या ध्वजाचा रंग आणि राजकारण दोन्हीही बदललं आहे. दरम्यान राज ठाकरे आज संध्याकाळी पक्षाचा अजेंडाही स्पष्ट करणार आहेत.