मुंबई : मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाकडून ड्रग्ज आणि ड्रग्ज विक्रेत्यांच्या विरोधात कारवायांमध्ये आता वाढ झाली आहे. अमली पदार्थ विरोधी पथाकाच्या वांद्रे युनिटने शुक्रवारी एका मोठ्या आंतरराष्ट्रीय टोळीला उध्वस्त केलं असून त्यांच्याकडून 3 कोटी 18 लाख रुपयांचं ड्रग्ज जप्त केलं आहेत. अमली पदार्थ विरोधी पथकाने त्यांच्याकडून 225 ग्रॅम कोकेन, 1 किलो 500 मॅफेड्रोन, 335 ग्रॅम एमडीएमए जप्त केलं आहे.
शुक्रवारी 31 डिसेंबर रोजी वांद्रे अमली पदार्थ विरोधी पथक वांद्रे-कुर्ला संकुल रोड वांद्रे या ठिकाणी गस्त करत असताना त्यांना एक नायजेरियन नागरिक दिसला जो संशयास्पद रित्या वावरत होता. जेव्हा त्या पथकाने नायजेरियन नागरिकाकडे चौकशी केली आणि त्याच्याकडे असलेल्या बॅगेची जेव्हा तपासणी केली, त्या वेळेला पोलिसांना त्याच्या बॅगमध्ये कोकेन आणि मॅफेड्रॉन सापडले. पोलिसांनी त्या नायजेरियन नागरिकास अटक केली. इबे चीनेडू माईक (वय 39) असं या अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचं नाव आहे. त्याने दिलेल्या माहितीवरुन पोलिसांनी ओडीफे नदुबुसी बारथॉलॉम्यु (वय 40) आणि मंडे ओगबोनीया इगव्यु (वय 38) या दोन आरोपींना नंतर अटक केली.
अटक करण्यात आलेले आरोपी मुंबई आणि मुंबई उपनगरात असलेल्या उच्चभ्रू वस्त्यांमध्ये ड्रग्जची विक्री करायचे. तसेच मानखुर्द परिसरातसुद्धा ड्रग्जची विक्री करत होते. या आधी पोलिसांनी त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला मात्र अंधाराचा फायदा घेऊन ते पसार व्हायचे. याच ठिकाणी पोलिसांवर हल्लासुद्धा झाला होता.
अटक करण्यात आलेले आरोपी हे नवी मुंबईच्या वाशी येथे राहत असून ते मुंबई आणि इतर शहरात कपड्यांचा व्यवसाय करण्याच्या बहाण्याने यायचे आणि ड्रग्सचा व्यापार करायचे. इतकंच नाही तर या तिघांचाही संबंध आंतरराष्ट्रीय ड्रग्स टोळीशी असण्याची दाट शक्यता पोलीसांनी व्यक्त केली आहे. पोलीस आता त्या अनुषंगाने तपास करत आहेत. इबे माईकवर या आधी बंगळुरुमध्ये ड्रग्ज तस्करी करण्यासंदर्भात गुन्हा सुद्धा दाखल आहे..
सदर कारवाई पोलीस सह-आयुक्त मिलिंद भारंबे, गुन्हे शाखेचे अप्पर पोलीस आयुक्त वीरेश प्रभू, पोलीस उपायुक्त अमली पदार्थ विरोधी कक्ष दत्ता नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
महत्त्वाच्या बातम्या :