मुंबई : चीनने भारतीय जवानांवर केलेल्या हल्ल्यानंतर आता भारतातील मोठ्या प्रकल्पांमधून चीनला हद्दपार करण्यास सुरुवात झाली आहे.
एमएमआरडीएकडून मुंबईतील मोनोरेलसाठीचे चिनी कंपन्यांकडून मागवलेल्या निविदा रद्द करण्यात आल्या आहेत. एमएमआरडीए प्रशासनाकडून दहा मोनोरेलच्या रॅकसाठीच्या कंत्राटासाठी दोन चिनी कंपन्यांकडून निविदा मागवल्या होत्या. ही प्रक्रिया अंतिम टप्प्यात होती, मात्र दोन्ही चिनी कंपन्यांसोबतच्या निविदा आता रद्द करण्यात आल्या आहेत.


या चिनी कंपन्यांऐवजी BHEL आणि BEML या भारतीय कंपन्यांना हे कंत्राट देण्याबाबत चर्चा सुरु असल्याची माहिती मिळाली आहे.


या चिनी कंपन्यांकडून वारंवार मोनोरेलच्या कंत्राटातील अटी-शर्तींची फेरमांडणी करण्याबाबत सुचवले जात होते, जे एमएमआरडीए प्रशासनाला करणं शक्य नव्हते. तसेच, मेड इन इंडियासारखा उपक्रम आणि भारतीय कंपन्यांना चालना देण्यासाठी एमएमआरडीएने ही निविदा चिनी कंपन्यांकडून काढून घेण्याचे ठरवले.


लडाखमधील गलवान खोऱ्यात भारत आणि चीन सैन्यात सोमवारी (15 जून) झालेल्या हिंसक संघर्षामुळे सीमेवर तणावाचं वातवारण आहे. चीनने भारतीय जवानांवर केलेल्या हल्ल्यानंतर आता भारताकडून चीनला अद्दल घडवण्यासाठी तयारी सुरु आहे. या पार्श्वभूमीवर सीमारेषेवर तसेच आर्थिक व्यवहारातही भारताने युद्ध आरंभलं आहे.


देशभरात चिनी कंपन्या आणि चिनी वस्तूंवर बहिष्कार घालण्याचं सत्र सुरु आहे. अनेक संस्थांकडून अशी आवाहनं केली जात आहेत. मात्र, चीनच्या आर्थिक नाड्या आवळण्यासठी भारतातील मोठ्या प्रकल्पांमधूनही चिनी कंपन्यांना हद्दपार करणं गरजेचं आहे. त्याचाच एक भाग म्हणून मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन डेव्हलपमेंट अथॉरिटीकडून (MMRDA) मुंबईतील मोनोरेलसाठीची सध्याची निविदा प्रक्रिया रद्द करुन तातडीने नवी प्रक्रिया सुरु करण्यात येणार आहे.


संबंधित बातम्या