मुंबई : कोरोना व्हायरसच्या संकटात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. कित्येकांवर उपासमारीची वेळ आली आहे. अशा परिस्थितीत महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना शालेय शुल्क भरण्यासाठी परिपत्रक काढले आहे. सध्या अनेक विद्यार्थ्यांच्या पालकांकडे कुटुंब चालवण्यासाठी पैसे नाहीत ते शालेय शुल्क कुठून भरणार? त्यामुळे या विषयाकडे लक्ष देऊन विद्यार्थ्यांना पैसे भरण्यासाठी थोडा कालावधी द्यावा किंवा टप्प्याटप्प्याने पैसे भरण्याची सोय उपलब्ध करुन द्यावी, अशी मागणी युवा सेनेच्या वतीने तंत्रशिक्षण संचालनालयाचे संचालक डॉ. अभय वाघ यांच्याकडे पत्राच्या माध्यमांतून करण्यात आली आहे. याबाबतचे पत्र मुंबई विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य प्रदीप सावंत आणि राजन कोलंबेकर यांनी दिले आहे.


कांदिवलीच्या ठाकूर कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आणि गोरेगावच्या पाटकर कॉलेजकडून विद्यार्थ्यांना संपूर्ण शुल्क भरण्याबाबत नोटीस देण्यात आली आहे. ठाकूर कॉलेजच्या अभियांत्रिकीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या वर्षासाठीचे अनुक्रमे 86 हजार आणि 73 हजार इतके शुल्क आहे. तर पाटकर कॉलेजच्या बॅचलर ऑफ कॉमर्स इन बँकिंग अँड इन्शुरन्स अभ्यासक्रमाचे अनुक्रमे दुसऱ्या वर्षाचे 21 हजार तर तिसऱ्या वर्षाचे 22 हजार इतके शुल्क आहे.



याबाबत बोलताना युवा सेनेचे मुंबई विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य प्रदीप सावंत म्हणाले की, "मागील तीन महिन्यांत कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अनेकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हजारो कंपन्या बंद पडल्या आहेत. कित्येक नोकरदारांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. त्यामुळे अनेक कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे. आता जगायचं कसं हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा आहे. अशा भयंकर परिस्थितीत तंत्रशिक्षण देणाऱ्या महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना 30 जूनपर्यंत वार्षिक संपूर्ण शुल्क भरण्याबाबतचे पत्र पाठवले आहे. त्यामुळे आता अनेक पालकांसमोर अचानक इतकी मोठी रक्कम कुठून उपलब्ध करायची हा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यामुळे अनेक पालकांनी युवा सेनेकडे याबाबत तक्रारी दिल्या आहेत.



यामध्ये पालक आणि विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की, "अचानक इतकी मोठी रक्कम उपलब्ध होणे अवघड आहे. यासाठी महाविद्यालयांनी आम्हाला टप्प्याटप्प्याने शुल्क भरण्याची सुविधा उपलब्ध करुन द्यावी. यामुळे आमच्यावरीही ताण येणार नाही आणि महाविद्यालये देखील अडचणीत येणार नाहीत."


महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण विभागाचे राज्याचे संचालक डॉ. अभय वाघ म्हणाले की, "तंत्रशिक्षण विभागाचे सर्व अधिकार केंद्राकडे आहेत. याबाबत केंद्रीय परिपत्रक काढण्यात आले आहे. यामध्ये महाविद्यालयांना यंदा शैक्षणिक शुल्कामध्ये वाढ करु नये असं आवाहन करण्यात आलं आहे. शुल्कमाफी किंवा शुल्क घेऊ नये याबाबत कोणताही उल्लेख करण्यात आलेला नाही. ठाकूर अभियांत्रिकी कॉलेजबाबतची युवा सेनेने दिलेली तक्रार आम्हाला प्राप्त झाली आहे. आमच्या विभागाकडून केंद्रीय स्तरावरुन आलेल्या पत्राच्या अनुषंगाने संबंधित महाविद्यालयाला सूचना करण्यात आल्या आहेत.