मुंबई : 'कॉन्फडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स' अर्थात कॅटतर्फे सुरु असलेल्या चिनी वस्तूंवरील बहिष्काराच्या आंदोलनाची तीव्रता वाढवण्यात येणार आहे. कॅटने 500 पेक्षा जास्त चायनीज वस्तूंची यादी जाहीर केली असून त्यावर बहिष्कार घालण्याचं नियोजन आहे. कॉन्फेडरेशनचे राष्ट्रीय संगठन मंत्री ललित गांधी यांनी ही माहिती दिली. लडाख सीमेजवळ गलवान खोऱ्यात चीन सैन्यासोबत झालेल्या झटापटीत 20 भारतीय जवान शहीद झाल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.


या यादीमध्ये खेळणी, फर्निशिंग फॅब्रिक, कापड, चप्पल, वस्त्रे, स्वयंपाकघरातील साहित्य, बिल्डर हार्डवेअर आणि ग्राहकोपयोगी वस्तू इत्यादी वस्तूंचा समावेश आहे. "डिसेंबर 2021 पर्यंत चिनी वस्तूंची आयात एक लाख कोटींनी कमी करावी, हा या बहिष्कारामागील उद्देश असल्याचं कॅटचे सरचिटणीस प्रवीण खंडेलवाल यांनी सांगितलं. व्यापाऱ्यांच्या संघटनेने निवेदनात म्हटलं आहे की, "बहिष्कारासाठी निवडलेल्या 500 वस्तूंच्या उत्पादनासाठी प्रगत तंत्रज्ञानाची आवश्यकता नाही आणि त्या भारतात तयार केल्या जाऊ शकतात."


सोमवारी (15 जून) रात्री उशिरापर्यंत झालेल्या या झटापटीत 20 भारतीय जवान शहीद झाले. यानंतर संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे. सरकार आणि सैन्य त्यांच्या पद्धतीने याला उत्तर देईलच. परंतु देशाचे जबाबदार नागरिक या नात्याने जनतेनेही आपल्या पद्धतीने चीनला उत्तर द्यावं, अशी अपेक्षा कॅटने व्यक्त केली आहे. चीनला उत्तर द्यावे अशा अपेक्षेने कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सचे अध्यक्ष बी.सी.भरतीया, सरचिटणीस प्रवीण खंडेलवाल, राष्ट्रीय संगठन मंत्री ललित गांधी, उपाध्यक्ष धैर्यशील पाटील आणि अन्य पदाधिकार्‍यांनी चीनच्या कृत्याचा तीव्र शब्दात निषेध केला. तसंच चिनी वस्तूंवरील बहिष्काराचे आंदोलन तीव्र करण्याचा निर्णय घेऊन बहिष्काराच्या नवीन वस्तूंची यादी जाहीर केली.


सरकारने चिनी कंपन्यांना दिलेली कंत्राटे तात्काळ रद्द करावीत अशी मागणी कॅटने सरकारकडे केली आहे. "गेल्या काही दिवसांतील सरकारी टेंडर्समध्ये चिनी कंपन्या अत्यंत कमी दराने निविदा भरुन सरकारी कंत्राटे मिळवत आहेत. हे पाहता सरकारने भारतीय कंपन्यांसाठी अतिरिक्त दर देण्याची विशेष तरतूद करुन भारतीय कंपन्यांनाच कंत्राटे द्यावीत," अशी मागणी केल्याची माहिती ललित गांधी यांनी दिली.


पेटीएम, बिग बास्केट, स्विगी, फ्लिपकार्ट सारख्या भारतीय कंपन्यांमध्ये चीनने मोठ्या प्रमाणात गुंतवणुक केली आहे ही आगामी आर्थिक आक्रमणाची नांदीच आहे. भारतातील किरकोळ व्यापाराची बाजारपेठ काबीज करण्याची चीनची कारस्थाने लपून राहिलेली नाहीत. त्यामुळे सरकारने चीनी कंपन्यांच्या गुंतवणुकीवर तात्काळ कठोर निर्बंध लागू करावेत, अशी मागणी ललित गांधी यांनी केली.


यासोबतच भारतीय अभिनेते आणि क्रिकेटपटूंनी चिनी वस्तूंच्या जाहिराती करु नयेत, असे आवाहनही कन्फेडरेशनने केलं आहे. विशेषतः दीपिका पादूकोण, आमीर खान, विराट कोहली, रणवीर सिंह, सारा अली खान, रणबीर कपूर, विकी कौशल यांनी करार रद्द करावेत, अशी मागणी कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने केली आहे.


Boycott Chinese Products | कोल्हापुरात चिनी मोबाईल न विकण्याचा दुकानदाराचा निर्णय