मुंबई : भारत-चीन सीमेवर सध्या तणावाचे वातावरण आहे. काल झालेल्या झटापटीत भारताचे 20 जवान शहीद झाले आहेत. यावरुन गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. 12 जूनला दिल्ली मेरठ मेट्रोच्या कामात एल&टी या भारतीय कंपनीला डावलून चिनी 'शांघाय टनेल इंजिनिअरिंग कंपनी'ला दिलेलं कॉन्ट्रॅक्ट आधी रद्द करायला सांगा, असं आव्हान जितेंद्र आव्हाड यांनी दिलं आहे.
भारत-चीन सीमेवरुन दोन्ही देशांमध्ये सुरू असलेल्या वादावरुन केंद्रातील सरकारवर गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी टीका केली आहे.
काय म्हणाले जितेंद्र आव्हाड?
आत्मनिर्भरच्या गप्पा मारून झाल्यावर 12 जून 2020 ला दिल्ली मेरठ मेट्रोचं कॉन्ट्रॅक्ट दिलेलं आहे. हे कॉन्ट्रॅक्ट कुणी दिलं? रेल्वे कुणाच्या अखत्यारीत आहे? केंद्राच्या ना? त्यानंतर 15 जूनला चिन्यांनी आपल्या 20 जवानांना मारले. हे कसले बोंबलाचे परराष्ट्र धोरण? 12 जूनला दिल्ली मेरठ मेट्रोच्या कामात एल&टी या भारतीय कंपनीलाला डावलून चिनी 'शांघाय टनेल इंजिनिअरिंग कंपनी'ला दिलेलं कॉन्ट्रॅक्ट आधी रद्द करायला सांगा, असं आव्हान आव्हाड यांनी दिलं आहे. एकप्रकारे आत्मनिर्भर भारताची जरी घोषणा केली असली तरी कंत्राटं मात्र चिनी कंपनीला देत असल्याचा आरोप आव्हाड यांनी लावला आहे.
राहुल गांधी यांचीही केंद्रावर टीका
जवानांना श्रद्धांजली वाहताना संरक्षणमंत्र्यांच्या वक्तव्यात चीनचा उल्लेखही का नाही, असा प्रश्न काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी उपस्थित करत सरकारवर हल्लाबोल केला आहे. गलवान खोऱ्यात झालेल्या हिंसक झटापटीत भारताचे 20 जवान शहीद झालेत. या घटनेवर देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या रुपानं तब्बल 36 तासानंतर पहिली सरकारी प्रतिक्रिया आली. त्यावर राहुल गांधींनी पाच प्रश्न उपस्थित केले आहेत. राजनाथ सिंह यांनी जवानांना श्रद्धांजली वाहणारं जे ट्विट केलं आहे, त्यात चीनचा उल्लेखही नसणं हा जवानांच्या बलिदानाचा अपमान आहे अशी टीका राहुल गांधी यांनी केली आहे. जर खरोखर इतक्या वेदना झाल्या असतील तर अशी सुरुवात करुन राहुल गांधींनी पाच प्रश्न उपस्थित केले आहेत. ज्यात त्यांचा पुढचा प्रश्न आहे की जवानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी दोन दिवस का लागले? जवान शहीद होत असतानाही राजकीय सभा का सुरु ठेवल्या जातायत?
India-China Dispute | गलवान खोऱ्यात चिनी सैन्याकडून कट आखून हिंसाचार : भारत