MLA Raju Patil On MNS BJP Shinde Group Allaince: मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray), मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) यांच्यातील जवळीकता गेल्या काही दिवसांपासून पाहायला मिळत आहे. यावरुन मनसे-भाजप-शिंदे गटाच्या युतीच्या चर्चा देखील रंगल्या आहेत. आता मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांनी मात्र स्पष्टपणे ही युती होण्यासंदर्भात समर्थन केलं आहे. मनसेनं भविष्यात शिंदे आणि फडणवीसांसोबत युती करायला हरकत नाही, असं मोठं वक्तव्य मनसे आमदार राजू पाटील यांनी केलं आहे. आम्हाला आमचा पक्ष वाढवायचा नाही का? राज ठाकरे यांचे आदेश आले तर नक्कीच युती करू, असं राजू पाटील म्हणाले आहेत.


आमदार राजू पाटील हे अंबरनाथमध्ये मनसे शहराध्यक्ष कुणाल भोईर यांनी आयोजित केलेल्या दीपोत्सवाच्या उद्घाटनासाठी आले होते. यावेळी त्यांना राज ठाकरे यांची शिंदे-फडणवीस यांच्याशी जवळीक वाढत असल्याबाबत विचारलं असता ते म्हणाले की, आमच्यासारख्या बाहेरून पाठिंबा असलेल्या पक्षांच्या मागण्या जर हे सरकार मान्य करत असेल, सकारात्मक प्रतिसाद देत असेल, तर जवळ येण्यास हरकत नाही, असं राजू पाटील म्हणाले. 


शिंदे आणि फडणवीस सरकारकडून मागण्यांच्या बाबतीत सकारात्मक पावलं


तसंच पूर्वीच्या सरकारमध्ये कुणी दखलच घेत नव्हतं. शिवाय एखादी मागणी केली की ती कशी पूर्ण होणार नाही, याकडे लक्ष दिलं जायचं, असा आरोप त्यांनी केला. तर शिंदे आणि फडणवीस सरकारकडून मात्र आमच्या मागण्यांच्या बाबतीत सकारात्मक पावलं पडताना दिसत असून त्यामुळे जवळीक वाढली आहे हे मी मान्य करेन, असं राजू पाटील म्हणाले.


राज ठाकरे यांनी आदेश दिले तर आम्ही एकत्र यायला तयार आहोत


भविष्यात मनसेची या दोन पक्षांशी युती होऊ शकेल का? असं त्यांना विचारलं असता, आम्ही स्वबळावर लढणार आहोत हे राज ठाकरे यांनी आधीच सांगितलं आहे. मात्र तरीही भविष्यात तशी काही परिस्थिती निर्माण झालीच, तर एकत्र यायला हरकत नाही, असं राजू पाटील म्हणाले. तसंच सध्या ज्या युत्या आणि आघाड्या होतायत, त्यावर कुणाकडेही काहीही बोलायला राहिलेलं नाही. त्यामुळं आम्ही आमचा पक्ष वाढवायचा नाही का? असं म्हणत राज ठाकरे यांनी जर आदेश दिले, तर आम्ही एकत्र यायला तयार आहोत आणि त्यावर कुणाला काही हरकत नसावी, असं देखील राजू पाटील यांनी म्हटलं आहे.