मुंबई : मुंबईतील बोरिवली (Borivali) पूर्वेकडील अभिनव नगर येथील मैदानात मनसेकडून (MNS) तीन दिवसीय मिसळ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार 26 जानेवारी रोजी या महोत्सवाला सुरुवात झाली. दरम्यान या मिसळ महोत्सवाला मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी देखील भेट दिली. तसेच यावेळी शिंदे गटाचे (Shinde Group) आमदार प्रकाश सुर्वे (Prakash Surve) यांनी देखील उपस्थिती लावली. त्यामुळे उपस्थितांमध्ये वेगळ्या चर्चा रंगू लागल्याचं पाहायला मिळालं. या मिसळ महोत्सवाला बोरिवलीकरांनी देखील उस्फूर्त प्रतिसाद दिला. 


मागील काही दिवसांपासून सरकारमधील उलथापालथी पाहता अनेक समीकरणं बदललीत. त्यातच राज ठाकरे यांच्या बाबत देखील अशाच चर्चा रंगत होत्या. राज ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात देखील अनेक भेटी झाल्या. त्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चा रंगू लागल्या. पण या दोन्ही नेत्यांच्या भेटीमागे कोणतंही राजकीय कारण नसल्याचं स्पष्टीकरण वारंवार दिलं जातं. पण तरीही आगामी काळात या दोन्ही पक्षांमध्ये युतीची शक्यता देखील नाकारता येत नाही. 


शिंदे गटाचे आमदार राज ठाकरेंच्या व्यासपीठावर


दरम्यान मनसेकडून आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला प्रकाश सुर्वे यांनी हजेरी लावली. त्यामुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. त्यातच ज्या दिवशी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या सोहळ्याला हजेरी लावली त्याच दिवशी प्रकाश सुर्वे देखील उपस्थित होते, त्यामुळे या चर्चांना राजकीय दृष्ट्या अधिक महत्त्व प्राप्त झालं असल्याचं म्हटलं जात आहे. 


 खरंतर राज ठाकरे यांची परप्रांतीयांबाबत असलेली भूमिका भाजप मनसे युतीसाठी मारक आहे, असं भाजपच्याच नेत्यांकडून वारंवार ऐकायला मिळालं होतं. पण सध्या भाजपसोबत असणारा शिंदे गट मात्र मनसे युतीसाठी पुरक असल्याची चर्चा भाजपच्या गोटात आहे.त्यामुळे शिंदे- ठाकरे युती झाल्यास याचा थेट फायदा भाजपलाच होण्याची शक्यता असल्याचं म्हटलं जातंय.


राज ठाकरे आणि मुख्यमंत्री शिंदे यांच्या भेटीचं सत्र


मागील काही महिन्यांमध्ये एक गोष्ट प्रकर्षाने पाहायला मिळाली ती म्हणजे, राज ठाकरे कोणताही विषय हाती घेतात आणि सरकार त्यावर तातडीने ठोस पावलं उचलत असल्याचं पाहायला मिळतंय. मग तो टोलाचा विषय असो, मराठी पाट्यांचा की बीडीडी सिडको रहिवाश्यांचा तो विषय असो.  राज ठाकरे विषय घेऊन मुख्यमंत्र्यांकडे पोहोचतात आणि मग मंत्री राज ठाकरेंच्या भेटीला शिवतीर्थावर पोहोचतात. असंच चित्र सध्या आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांसोबतची भेट असो किंवा शिंदे गटाच्या आमदारांनी मनसेच्या कार्यक्रमला लावलेली हजेरी असो, या सगळ्यामुळे राजकीय वर्तुळात नव्या युतीची नांदी पुन्हा होणार नाही हा प्रश्न कायम उपस्थित केला जातोय. 



हेही वाचा : 


Raj Thackeray and Eknath Shinde Meet : राज ठाकरे-एकनाथ शिंदे यांची पुन्हा भेट, राजकारणात नव्या युतीची नांदी?