मुंबई : मागील काही दिवसांत मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या वारंवार भेटीगाठी होताना पाहायला मिळतंय.  गुरुवार 28 डिसेंबर रोजी देखील जनतेचे काही विषय घेऊन दोन्ही दिग्गज नेते भेटले.  या भेटीमागे आगामी काळातील युतीची नांदी तर नाही अशी जोरदार चर्चा सध्या राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा रंगू लागलीये. कारण जनतेच्या विषयावर झाल्यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये बंद दाराआड देखील चर्चा झाली. बंद दाराआड झालेल्या या चर्चेमुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं. 


या दोन्ही नेत्यांमध्ये वारंवार भेटींचं सत्र सुरु आहे. पण तरीही या भेटीमागे कोणतंही राजकीय कारण नसल्याचं सांगितलं जात असलं तरीही आगामी काळात शिंदे गट आणि मनसेमध्ये युती होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. गणपतीत एकनाथ शिंदे यांनी शिवतिर्थावर जाऊन राज ठाकरे यांच्या बाप्पाचं दर्शन घेतलं आणि तिथून या सर्व चर्चांना सुरुवात झाली. पण त्यानंतर अनेकदा राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात औपचारिक आणि अनपौचारिक अनेक भेटी झाल्या. या भेटीमागे नेमकी कारणं काय होती हे अद्यापही समोर आलेलं नाही. 


 ठाकरे -शिंदे भेटीतून नव्या युतीची नांदी?


राज्यात शिंदे फडणवीस सरकार आल्यानंतर शिंदे आणि ठाकरे यांच्या भेटी सातत्याने पाहिला मिळाल्या. कधी गणेशोत्सवाच्या निमित्ताने सदिच्छा भेट तर कधी मनसे दीपोत्सवाच्या निमित्ताने एका मंचावर हजेरी, कधी चित्रपटाच्या मुहूर्ताच्या निमित्ताने तर कधी जनतेचे विषयांवर चर्चा करण्यासाठी. या सगळ्या भेटींमध्ये दोन्ही नेत्यांमध्ये होणारी बंद दाराआड चर्चा हा राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरतोय. आता आज पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांची वर्षा वर भेट झाली आणि हेच कारण पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चेसाठी कारण ठरलं आहे. 


शिवतिर्थावर भेटीगाठींचं सत्र


मागील काही महिन्यांमध्ये एक गोष्ट प्रकर्षाने पाहायला मिळाली ती म्हणजे, राज ठाकरे कोणताही विषय हाती घेतात आणि सरकार त्यावर तातडीने ठोस पावलं उचलत असल्याचं पाहायला मिळतंय. मग तो टोलाचा विषय असो, मराठी पाट्यांचा की बीडीडी सिडको रहिवाश्यांचा तो विषय असो.  राज ठाकरे विषय घेऊन मुख्यमंत्र्यांकडे पोहोचतात आणि मग मंत्री राज ठाकरेंच्या भेटीला शिवतीर्थावर पोहोचतात.   मंत्री दादा भुसे टोलचा विषय मार्गी लावण्यासाठी राज ठाकरे यांच्याकडे पोहोचले तर मंत्री तानाजी सावंत आरोग्य विभागाचा विषय सोडवण्यासाठी शिवतीर्थावर आले. 


 खरंतर राज ठाकरे यांची परप्रांतीयांबाबत असलेली भूमिका भाजप मनसे युतीसाठी मारक आहे,  असं वारंवार भाजपच्या नेत्यांकडून ऐकायला मिळालं होतं.  मात्र सध्या भाजपसोबत असणारा शिंदे गट मात्र मनसे युतीसाठी पुरक असल्याची चर्चा भाजपच्या गोटात आहे. त्यामुळे शिंदे- ठाकरे युती झाल्यास याचा थेट फायदा भाजपलाच होण्याची शक्यता असल्याचं म्हटलं जात आहे . याचा प्रत्यय देखील दीपोत्सवाच्या निमित्ताने तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी एकत्र येऊन संपुर्ण महाराष्ट्राला दिलाय.


यामुळेच की काय एकेकाळी मोदी- शहांना विरोध करणाऱ्या राज यांनी अचानक हिंदुत्वाचा मुद्दा आक्रमकपणे हाती घेतल्याचा पाहिला मिळत आहे. मशिदीवरील भोंगे, हनुमानचालिसा यांसारखे मुद्दे उपस्थित करताना पाहिला मिळाले होते. यावेळी भाजपकडून मनसेच्या भूमिकेचं समर्थन करण्यात आल्याचं पाहिला मिळालं होतं. सध्याची राजकीय परिस्थिती पाहता महाविकास आघाडीविरोधात दुसऱ्या बाजूने मजबूत आघाडी देणं गरजेचं आहे. त्यामुळे मनसेला सोबत घेतल जाणार का हे पाहणं ही महत्वाचं असणार आहे. 


हेही वाचा : 


राम मंदिरांच्या उद्घाटनासाठी मुंबईतील 350 निमंत्रीतांची यादी तयार; राज ठाकरेंचंही नाव, उद्धव ठाकरेंबाबत निर्णय काय?