मुंबई : केंद्र सरकारने राज्याला पाठवलेली सुमारे एक हजार टन चणाडाळ सरकारच्या गोदामात, दुकानात पडून सडल्याचा आरोप भाजपचे आमदार मिहीर कोटेचा यांनी केला आहे. या डाळीचे सर्वसामान्य जनतेला फेरवाटपाचे निर्देश वेळेत दिले गेले असते तर आज कित्येक परिवाराला त्याचा लाभ मिळाला असता. या डाळ नासाडीबाबत हलगर्जीपणा केल्याबाबत तातडीने चौकशी करावी आणि संबंधित मंत्री छगन भुजबळ यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणीही मिहीर कोटेचा यांनी केली आहे.


2020 मध्ये भारतासह राज्यात कोविड-19 चा प्रार्दुभाव वाढत गेल्याने त्यावर नियत्रंण मिळवण्यासाठी लॉकडाऊन लागू केला. या काळात अनेक नागरिकांचे रोजगार गेले, तसंच अनेकांना मोठ्या आर्थिक संकटाला सामोरं जावं लागलं होतं. त्यातच संकटकाळात केंद्र सरकारने 'प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना' अंतर्गत महाराष्ट्रासह संपूर्ण देशात गोरगरीब जनतेला मोफत वाटण्यासाठी धान्य पाठवले होते. त्यात प्रति कुटुंबासाठी एक किलो चणाडाळही मोठ्या संख्येने पाठवली होती. केंद्र सरकारकडून आलेलं धान्य पात्र शिधापत्रिकांना वाटप झाल्यानंतर ज्या नागरिकांनी धान्य घेतलं नाही ते राज्य सरकारच्या गोदामात, दुकानात तसेच पडून राहिले आणि ही डाळ आता सडून गेलेली असून किडे लागलेल्या स्थितीत आहे. 


मुंबई उपनगरात केंद्र सरकारकडून आलेली 300 टन चणाडाळ शासनाच्या गोदामात, दुकानात विनावाटप पडून असून त्यातील बहुतांश: डाळीची मोठ्या प्रमाणात नासाडी झालेली आहे. त्यात अक्षरशः किडे पडले असून वापरण्यायोग्य राहिलेली नाही. राज्यात अशाप्रकारे 1000 टन चणाडाळ खराब झाली आहे, असा आरोप भाजप आमदार मिहीर कोटेचा यांनी केला आहे.