मुंबई : मीरा-भाईंदर महापालिकेच्या निवडणुकीचं बिगुल नुकतच वाजल असून, सर्वच पक्षांची पालिकेवर सत्ता मिळवण्यासाठी जोरदार तयारी सुरु केली आहे. पण काँग्रेसनं या निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांकडून 200 गुणांची मराठीची लेखी परीक्षा घेतली. मीरा-भाईंदर महापालिकेतील सत्ताधारी भाजप-सेनेला सत्तेसाठी दूर करण्यासाठी यावेळी काँग्रेसने मराठी कार्ड वापरण्याचं ठरवलं आहे. यात काँग्रेसने पहिल्यांदाच मराठी भाषेवर आधारित लेखी परिक्षा आयोजित केली होती. या परिक्षेत इच्छूक उमेदवारांकडून मुलाखतीपूर्वी 200 गुणांचा पेपर देण्यात आला होता. ही प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी इच्छुकांना 10 मिनिटाचा वेळ देण्यात आला होता. या मुलाखतीसह परिक्षेचा अहवाल थेट प्रदेश कमिटीला पाठविला जाणार आहे. या आधी महापालिका निवडणुकीसाठी परीक्षा घेण्याचा ट्रेण्ड मनसेनं आणला होता. मनसेनं मुंबई महापालिका निवडणुकीसाठी 2012 मध्ये इच्छुकांची लेखी परीक्षा घेतली होती. आता हाच ट्रेंण्ड काँग्रेसनंही आवलंबला असून,मीरा-भाईंदर महापालिकेसाठी काँग्रेसनं 200 गुणांची मराठी विषयाची लेखी परीक्षा घेतली. मीरा-भाईंदर महापालिकेसाठी 20 ऑगस्ट रोजी होणार असून, 21 ऑगस्ट रोजी मतमोजणी होणार आहे. एकूण 24 प्रभागांतील 95 जागांसाठी ही निवडणूक होत आहे.
एकूण लोकसंख्या 8 लाख 9 हजार 378
मतदार 5 लाख 93 हजार 345
एकूण प्रभाग 24
एकूण जागा 95 (महिला 48)
सर्वसाधारण प्रवर्ग 64 (महिला 32)
अनुसूचित जाती 4 (महिला 2)
अनुसूचित जमाती 1
मागास प्रवर्ग 26 (महिला 13)