मुंबई : कर्जमाफीचे पैसे मिळण्यासाठी शेतकऱ्यांना अजून एक महिना थांबावं लागणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. राज्य सरकारकडून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या प्रक्रियेला उद्यापासून सुरुवात होणार आहे.


शेतकऱ्यांकडून निकषाचे ऑनलाइन अर्ज भरून घेतले जाणार आहेत. त्यानंतर, या अर्जांची बँकांमार्फत शहानिशा करण्यासाठी कमीत कमी एक महिन्याचा कालावधी लागणार आहे.

सीएलबीसीच्या (स्टेट लेव्हल बँकर्स कमिटी) बैठकीत बँक प्रतिनिधींशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सहकार मंत्री सुभाष देशमुख आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांची आज यासंदर्भात चर्चा झाली.

राज्यातील शेतकऱ्यांना 34 हजार 22 कोटी रुपयांची कर्जमाफी

राज्यातील सुमारे 89 लाख शेतकऱ्यांना 34 हजार 22 कोटी रुपयांची कर्जमाफी देण्यात आली आहे. 24 जून रोजी राज्य मंत्रिमंडळाच्या विशेष बैठकीत कर्जमाफीचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला होता.