मुंबई : मार्केटमध्ये ब्रँडेड प्रॉडक्ट्सच्या नावाखाली अनेक जीवघेण्या बनावट वस्तूंनी धुमाकूळ घातला आहे. मुंबईतील घाटकोपरमध्ये अशाच काही मोठमोठ्या कंपन्यांच्या नावाखाली भेसळयुक्त दूध तयार होत असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली. त्यानंतर सोमवारी रात्री पोलिसांनी छापेमारी केली आहे.
छाप्यात जवळपास आठशे किलो वजनाचा सव्वा तीन लाख रुपये किमतीचा बनावट माल पोलिसांनी जप्त केला आहे. याप्रकरणी चौघांना बेड्या ठोकण्यात आल्या असून घाटकोपर पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गोवर्धन कंपनीने आपल्या नावे भेसळयुक्त दुग्धजन्य पदार्थांची विक्री होत असल्याची वारंवार तक्रार केल्यानंतर पोलिसांनी घाटकोपरच्या चिराग नगरमध्ये दिशा एन्टरप्रायझेस नावाच्या कंपनीवर छापा घातला. कॉपीराईट अॅक्ट तसंच अन्न आणि औषध प्रशासनाच्या कलमांतर्गत संबंधितांवर कारवाई केली जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.