मुंबई : मुंबईतील दादर परिसरात राहणाऱ्या एका 15 वर्षीय मुलीने इमारतीच्या गच्चीवरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि तात्काळ मुलीला रुग्णालयात नेलं. मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. डॉक्टरांनी मुलीला मृत घोषित केलं. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
मुंबई पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, घटना शनिवारी दुपारी दोनच्या सुमारास घडली. या घटनेची माहिती स्थानिकांनी पोलिसांना फोन करून दिली. माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले आणि मुलीला उपचारासाठी रुग्णालयात घेऊन गेले. पोलिसांना घटनास्थळी कुठल्याही प्रकारची सुसाईड नोट सापडली नाही. तर आसपासच्या लोकांकडे चौकशी केली असता त्यांना सुद्धा काही फारशी माहिती नाही. त्यामुळे या मुलीने आत्महत्या का केली याबाबत कोणतही कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही. या अल्पवयीन मुलीने आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल का उचललं याचा तपास पोलीस करत आहेत.
पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आलं की आत्महत्या करण्यापूर्वी ही मुलगी सोसायटीच्या चेअरमनच्या घरी गेली होती. त्यांच्या पत्नीकडून तिने गच्चीची चावी मागितली. चेअरमनच्या पत्नी जेव्हा कारण विचारलं तेव्हा कपडे सुकत घालायचे आहेत असं कारण मुलीने दिलं. चेअरमनच्या पत्नीने तिला चावी दिली, त्यानंतर या मुलीने गच्चीवर जाऊन उडी मारून आपलं आयुष्य संपवलं.
पोलीस आता मृत मुलीच्या कुटुंबियांची आणि आजूबाजूच्या लोकांची चौकशी करत आहेत. तसेच या आत्महत्येमागे अजून काही वेगळं कारण तर नाही या अनुषंगाने प्रत्येक बाबींची चौकशी पोलिसांकडून केली जात आहे. पोलिसांच्या तपासात आता नेमकं काय समोर येतं आणि या आत्महत्येचे कारण काय आहे ते येणाऱ्या काही दिवसांमध्ये स्पष्ट होईल.