ठाणे : मुंब्रा बायपास मार्च आज वाहतुकीसाठी बंद असणार आहे. आज मुंब्रा आणि दिवा रेल्वे स्थानकादरम्यान मध्य रेल्वेच्या पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेच्या मुंब्रा खाडी पुलावर लोखंडी गर्डर टाकण्याच काम आज हाती घेण्यात आलं आहे. 76 मीटर लांबीचे हे दोन लोखंडी गर्डर आहेत. त्यासाठी मुंब्रा बायपास 24 तासांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. काल रात्री पासून काम सुरू झाले असून आज रात्री 12 पर्यंत हे काम सुरू राहील. मुंब्रा बायपास बंद असल्याने पर्यायी मार्गाने वाहतूक सुरु राहणार आहे.


मुंब्रा बायपास बंद असल्याने असा असेल पर्यायी मार्ग




  • वाहतूक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जेएनपीटीकडून मुंब्रा बायपासमार्गे नाशिक, भिवंडी व ठाणे ग्रामीणकडे जाणाऱ्या वाहनांना कळंबोली सर्कल, न्हावडे फाटा, तळोजे, एमआयडीसी, उसाटणे, खोणी, नेवाळी मार्गे, कल्याणमधून दुर्गाडीमार्गे भिवंडीकडे सोडण्यात येणार आहे.

  • नाशिकडे जाणाऱ्या वाहनांना आधारावाडी जेल, बांपगांव, पडघा नाका येथून मुंबई-नाशिक महामार्गाने नाशिकला जाता येईल.

  • ठाण्यातून जाण्यासाठी कल्याण फाटा, शिळफाटा येथून महापे, रबाळे, ऐरोली, मुलुंड टोलनाका, आनंदनगर टोलनाक्यावरून घोडबंदर रोडने माजीवड्यामार्गे जाता येईल.

  • गुजरात, पालघर येथून घोडबंदरमार्गे येणाऱ्या वाहनांना घोडबंदर रोडवरून ऐरोलीमार्गे नवी मुंबईकडे रवाना करण्यात येणार आहे.

  • नाशिकडून येणाऱ्या वाहनांनाही कल्याणमार्गे नवी मुंबईकडे वळवण्यात येणार आहे.


मुंब्रा शहरातून ठाणे-मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांसाठी


मुंब्रा बायपास वाहतुकीसाठी बंद असल्याने मुंब्रा शहरातून ठाणे-मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांना मुंब्रा वाय जंक्शन, शिळफाटा, उजवीकडे वळण घेऊन महापे रोड, रबाळे, ऐरोली मार्गे मुंबईकडे जाता येणार आहे. तसेच पुढे दिवा, विटावा, कळवा खाडी ब्रिज मार्गे ठाण्याकडेही जाणारा पर्यायी मार्ग असणार आहे.


पाचव्या सहाव्या मार्गिकेचे काम गेली 15 वर्ष सुरू आहे. आज होत असलेले काम अंतिम टप्प्यातले आहे. खाडीकिनारी उभारण्यात येणाऱ्या पुलाचे काम पूर्ण झाल्याने आज मुंब्रा बायपासवरील लोखंडी पूल उभारण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. सध्या असलेल्या धीम्या मार्गिकेच्या बोगद्याच्या बाजूला नवीन बोगदा तयार करण्यात आला आहे. त्या बोगद्याला खाडी किनारी उभारण्यात आलेल्या पुलाशी जोडण्यासाठी धीम्या मार्गिकेवर आणि मुंब्रा बायपासवर लोखंडी पूल उभारावे लागणार आहेत.  त्यासाठी आज 7 मार्चला आणि 21 मार्चला मुंब्रा बायपास 24 तासासाठी वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. मुंब्रा गर्डरची लांबी 80 मीटर, रुंदी 6 मीटर, उंची 11 मीटर आणि वजन 355 टन आहे.