मुंबई : महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. सलग दुसऱ्या दिवशी राज्यात दहा हजारांहून अधिक कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. सरकार आणि स्थानिक प्रशासन सातत्याने राज्यातील जनतेला कोरोनाच्या नियमांचं सक्तीने पालन करण्याचं आवाहन करत आहे. तरीही नागरिक या नियमांचं सर्रासपणे उल्लंघन करताना दिसत आहेत.


राज्यात गेल्या 24 तासात दहा हजार 187 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर 47 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 22 लाख 08 हजार 586 वर पोहोचली आहे. तर कोरोनामुळे आतापर्यंत 52 हजार 440 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील सध्याचा मृत्यूदर 2.37 टक्के आहे.


राज्यात सध्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 92 हजार 897 आहे. त्यात सर्वाधिक 19 हजार 615 अॅक्टिव्ह रुग्ण पुणे जिल्ह्यात आहेत. त्यानंतर नागपूर जिल्ह्यात हा आकडा 11 हजार 480 इतका झाला आहे. ठाणे जिल्ह्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची आकडेवारी 10 हजारांच्या पुढे आहेत. जिल्ह्यात सध्या 10 हजार 44 रुग्णांवर उपचार सुरु आहेत तर मुंबई महापालिका हद्दीत ही रुग्णसंख्या 8 हजार 984 इतकी झाली आहे.





राज्यात आज 6467 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. आजपर्यंत एकूण 20 लाख 62 हजार 031 रुग्णांना बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठवण्यात आलं आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 93.36% झालं आहे.


राज्यात आतापर्यंत तपासण्यात आलेल्या 1 कोटी 67 लाख 76 हजार 051 प्रयोगशाळा नमुन्यापैकी 22 लाख 08 हजार 585 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात रुग्ण आढळण्याचं प्रमाण 13.17 टक्के इतकं आहे. सध्या 4 लाख 28 हजार 676 व्यक्ती होमक्वॉरन्टीनमध्ये असून 4 हजार 514 जण इन्स्टिट्यूशनल क्वॉरन्टीनमध्ये आहेत.


मुंबईचं चित्रही महाराष्ट्रापेक्षा फार वेगळं नाही. शहरातही काही दिवसांपासून सातत्याने हजारांपेक्षा जास्त कोरोनाबाधित रुग्ण आढळत आहेत. मागील 24 तासात 1188 रुग्णांची नोंद झाली आहे. तर पाच जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत आतापर्यंत एकूण कोरोनाबाधितांची संख्या 3 लाख 32 हजार 208 पर्यंत पोहोचली आहे, तर शहरात आतापर्यंत एकूण 11 हजार 500 जणांचा मृत्यू झाला आहे. शहरात सध्या 8 हजार 984 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.