ठाणे : बाईक चालवण्याची मजा घेता यावी म्हणून बाईक चोरी करणाऱ्या 10 ते 15 वर्षे वयोगटातील नऊ मुलांना अटक करण्यात आली आहे. ही मुलं बाईक चालवून त्यातलं पेट्रोल संपलं, की ती एखाद्या सुरक्षित ठिकाणी लावून ठेवायचे आणि पुन्हा नवीन बाईक चोरी करायचे. एखाद्या चित्रपटाचं कथानक वाटावं, असा हा प्रकार ठाणे जिल्ह्यातील मुंब्र्यात घडला.
काय आहे प्रकरण?
मुंब्रा आणि परिसरात गेल्या काही दिवसात बाईक चोरीच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली होती. बाईक चोरी ही साधारणपणे पैशासाठीच होत असल्याने चोरटे चोरीच्या बाईक विकतात आणि पुन्हा नवीन सावज शोधतात, असा पोलिसांचा आजवरचा अनुभव. पण मुंब्रा परिसरात मागील काही दिवसात झालेल्या बाईक चोऱ्यांनी पोलिसांना चिंतेत टाकलं होतं. कारण या चोरी झालेल्या बाईक पेट्रोल संपलेल्या अवस्थेत पोलिसांना सापडत होत्या.
या प्रकरणाच्या मुळाशी गेल्यावर पोलिसांना आणि समस्त पालकवर्गाला चिंतेत टाकणारं एक धक्कादायक वास्तव समोर आलं. कारण, ही बाईक चोरणारी टोळी म्हणजे प्रत्यक्षात पाचवी ते दहावीच्या वर्गात शिकणारी लहान मुलं होती. फक्त बाईक चालवण्याची मजा घेता यावी म्हणून ते या बाईक चोरी करत होते.
पेट्रोल संपेपर्यंत बाईक चालवण्याचा आनंद
मुंब्रा, कळवा आणि डायघर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या काही दिवसांपासून बाईक चोरीच्या घटना वाढल्या होत्या. याबाबत तपास केल्यानंतर कुठेही चोरी झालेल्या बाईक विकल्या गेल्या असल्याची माहिती पोलिसांना मिळत नव्हती. त्यामुळे हा प्रकार कोण करतंय? याचा तपास करणं पोलिसांसाठी आव्हान बनलं होतं. अखेर गस्त वाढवल्यावर आणि बाईक चोरीच्या घटनांचा बारकाईने अभ्यास केल्यावर पोलिसांना या गुन्ह्याचा उलगडा करता आला.
मुंब्रा परिसरात राहणारी अवघी 10 ते 15 वर्षांची मुलं पार्किंगमधून या बाईक चोरी करायचे. उद्देश एकच, बाईक चालवण्याची मजा घेता यावी. या लहान मुलांची उंची कमी असल्याने अॅक्टिव्हा, स्कुटी अशा बाईक्सना ते प्राधान्य द्यायचे. एका 'मास्टर की'च्या साहाय्याने बाईकचं हॅन्डल ओपन झालं, की प्लगच्या वायर्स जोडून ते या बाईक सुरू करायचे आणि पेट्रोल संपेपर्यंत बाईक चालवण्याचा आनंद घ्यायचे.
बाईकमधलं पेट्रोल संपलं, की ती बाईक व्यवस्थित कुठेतरी लावून ठेवत पुन्हा नवीन बाईक शोधायचे. केवळ जॉय राईडसाठी अशाप्रकारे या मुलांनी तब्बल 7 लाख 60 हजार रुपयांच्या बाईक चोरल्या होत्या. याबाबत पोलिसांनी तपास करून 27 बाईक हस्तगत केल्या आणि सोबतच या बाईक चोरणाऱ्या या नऊ लहान मुलांना अटक केली.
अटक केलेली ही सगळी मुलं अल्पवयीन असल्याने त्यांची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली आहे. मात्र या घटनेनंतर पालकांची चिंता वाढली असून पालकांनी आपल्या लहान मुलांकडे लक्ष ठेवण्याची गरज निर्माण झाली आहे. कारण ही मुलं आपल्या मोहापायी आज अडचणीत सापडले आहेत.