मुंबई : मध्य आणि हार्बर मार्गावर आज (20 मे) सकाळी 11 ते दुपारी 4 या वेळेत मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. तर पश्चिम रेल्वेवर शनिवारी मध्यरात्री 12.50 ते दुपारी 4.50 वाजेपर्यंत बोरिवली ते भाईंदर स्थानकांमध्ये मेगाब्लॉक घेण्यात आला. या कालावधीत सर्व धीम्या गतीच्या लोकल गोरेगाव ते वसई-विरारमध्ये जलद मार्गावर चालतील. त्यात दिवसभरात काही लोकल फेऱ्या रद्द केल्या जाणार आहेत.

 मध्य रेल्वे

मध्य रेल्वेवर ठाणे ते कल्याण डाऊन जलद मार्गावर सकाळी 10.30 ते दुपारी 3.30 वाजेपर्यंत मेगाब्लॉक असेल. या कालावधीत सीएसएमटीहून सकाळी 9.25 ते दुपारी 2.54 या कालावधीत डाऊन जलद आणि अर्धजलद लोकल घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, मुलुंड स्थानकावरही थांबतील. ठाण्यापुढे सर्व जलद लोकल ठाणे आणि कल्याणमध्ये सर्व स्थानकांवर थांबतील. या ब्लॉकमुळे लोकल सेवा जवळपास 20 मिनिटे उशिराने धावणार आहे.

कल्याणहून सुटणाऱ्या सर्व अप जलद आणि अर्धजलद लोकल सेवा सकाळी 10.37 ते दुपारी 3.06 वाजेपर्यंत दिवा, मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला स्थानकावरही थांबतील. या कालावधीत लोकल सेवा 15 मिनिटे उशिरा धावण्याची शक्यता आहे.

हार्बर रेल्वे

हार्बर मार्गावर सीएसएमटी ते चुनाभट्टी/वांद्रे डाऊन मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. त्यामुळे मेगाब्लॉक काळात या मार्गावरील सेवा बंद असेल. दरम्यान, पनवेल ते कुर्ला (प्लॅटफॉर्म क्र. 8) ही विशेष सेवा चालवण्यात येणार आहे. शिवाय हार्बरच्या प्रवाशांना मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावरुन प्रवास करण्याचीही मुभा असेल.