मुंबई : मुंबई मेट्रो-3 चं कारशेड आरेमध्ये करण्यासाठी हजारो झाडांच्या कत्तली करण्यात आल्या होत्या. परंतु झाडांच्या कत्तलीमुळे वादग्रस्त ठरलेलं मेट्रो-3 चं कारशेड दुसरीकडे कुठे हलवता येईल का? यावर विचार करण्यासाठी ठाकरे सरकारने पाच सदस्यीय समिती नेमली. या समितीपुढे आता मेट्रो कारशेडसाठी रॉयल पामची जागा चर्चेत आहे. आरेतील मेट्रो कारशेडचा प्रकल्प आरेच्या परिसरातच असलेल्या रॉयल पाम या खाजगी विकासकाच्या जमिनीवर नेण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आरेतील प्रस्तावित मेट्रो कारशेडचा विरोध हा खाजगी विकासकांच्या फायद्यासाठी केला जातोय का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.


आरेच्या आंदोलनामागे खासगी विकासकांचं अर्थकारण दडलंय?


आरे कॉलनीतील प्रस्तावित मेट्रो-3चं कारशेड आता एक किमी अंतरावर असलेल्या रॉयल पाममध्ये हलवण्यासाठी हालचाली सुरु झाल्या आहेत. त्यामुळे 'आरे बचाव' असा नारा देणाऱ्या स्वयंसेवी संघटनांचा दुटप्पीपणाही यामधून उघड होत आहे. एकीकडे रॉयल पाम आपली जमीन कारशेडसाठी देण्याच्या बदल्यात शासनाकडून वाढीव एफएसआयची मागणी करत आहे. तर स्वयंसेवी संघटना मात्र, रॉयल पामची जमीन अगदी फुकटातच राज्य सरकारला मिळणार असल्याचा आभास निर्माण करत आहेत. त्यामुळे, पर्यावरण प्रेमाच्या नावाखाली खाजगी विकासकांचं अर्थकारण दडल्याचं आता समोर येत आहे.


आतापर्यंत आरेच्या मुद्द्यावर कसं राजकारण रंगलं?


मुंबई महापालिका जी गेली 30 वर्षे शिवसेनेच्याच ताब्यात आहे, त्याच महापालिकेतल्या वृक्ष प्राधिकरणाने आरे येथील झाडे तोडण्यास परवानगी दिली. इतकेच नव्हे तर याबाबत परवानगीचे पत्रही महापालिकेने मेट्रो प्राधिकरणाला दिलं. वृक्ष प्राधिकरण समितीत ही मंजुरी दिली जात असताना बराच गोंधळ झाला, या गोंधळातच ही मंजूरी दिली गेली. त्यानंतर एका रात्रीत 'आरे'मध्ये मेट्रो कारशेडच्या बांधणीसाठी 2700 झाडांची कत्तल करण्यात आली आहे. झाडांची कत्तल करण्यास रात्रीच्या काळोखाचा आधार घेण्यात आला होता. सामान्य जनतेला आणि पर्यावरणप्रेमींना ही बाब लक्षात येताच त्यांनी 'आरे'कडे धाव घेतली आणि मोठं जनआंदोलन सुरु झालं.


ठाकरे सरकार आल्यानंतर कामकाजाच्या पहिल्याच दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आरेतील मेट्रो कारशेडला स्थगिती दिली आणि पाच सदस्यीय समिती नेमून आरेऐवजी कारशेडसाठी दुसरी जागा निवडण्यास सांगितली. या समितीपुढे कांजुरमार्ग आणि इतर जागांसोबतच आरेपासून अवघ्या एक किमी अंतरावर असणाऱ्या रॉयल पामच्या जागेचा देखील पर्याय आहे. आरेतील कारशेडला विरोध होत असताना रॉयल पामने काही महिन्यांपूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र लिहिलं होतं. त्या पत्रामध्ये मेट्रो कारशेडसाठी रॉयल पामचा विचार करण्यात यावा, असं लिहिण्यात आलं होतं. असच आणखी एक पत्र रॉयल पामने आरे संवर्धनासाठी काम करणाऱ्या वनशक्ती या संस्थेलाही पाठवलं होतं. त्यामुळे रॉयल पाम या खाजगी विकासकाने मेट्रो कारशेडसाठी 30 ते 60 एकर जागा देण्याची तयारी दर्शविली.


आरे कॉलनीतील प्रस्तावित मेट्रो-3 चं कारशेड आता एक किमी अंतरावर असलेल्या रॉयल पाममध्ये हलवण्यासाठी हालचाली सुरु आहेत. एकीकडे रॉयल पाम आपली जमीन कारशेडसाठी देण्याच्या बदल्यात शासनाकडून वाढीव एफएसआयची मागणी करत आहे. त्यामुळे आरे बचावच्या घोषणेपाठीमागे खाजगी विकासकांचं अर्थकारण दडलंय का? असा प्रश्न समोर येतोय.


रॉयल पामचा इतिहास काय सांगतो?


1995 मध्ये भाजप-शिवसेना युतीचे सरकार असताना मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी शिवसेना प्रमुखांच्या सांगण्यानुसार उद्योगपती अमर नेन्सी यांना आरे कॉलनी येथील शेकडो एकर जागा त्यांच्या रॉयल पाम गोल्फ क्लब आणि निवासी बांधकामासाठी दिली होती. तेव्हाही शेकडो झाडे तोडण्याची परवानगी देण्यात आली होती. तेथील आदिवासींना पक्की घरे बांधून देण्याच्या बहाण्याने अमर नेन्सी यांनी रॉयल पाल्म ईस्टेट नावाने भव्य गृहनिर्माण प्रकल्प उभारला होता. आरेच्या 26 हेक्टर जागेत यापूर्वीच रॉयल पामकडून बांधकाम झालेले आहे.


ही जागा ना-विकास क्षेत्रात असून 20 वर्षांपूर्वी गोल्फ कोर्स आणि कंट्री क्लब तयार करण्याच्या नावाखाली हडपण्यात आली होती. या जागेवर केवळ 0.5 चटईक्षेत्र उपलब्ध असूनही इथे बांधकाम उभे आहे मुळात तेच अतिक्रमण आहे. अशा जागेवर राज्य सरकारने मेट्रो कारशेड बांधण्याऐवजी अतिक्रमण केलेल्यांवर कारवाई करायला हवी अशीही अनेक पर्यावरणप्रेमींची भावना आहे.


आरेमध्ये कोण, किती जागा वापरत आहे?


मॉडर्न बेकरी - 18 एकर
कोकण कृषी विद्यापीठ - 145.80 एकर
फिल्म सिटी - 329 एकर
महानंद डेरी - 27 एकर
वॉटर कॉम्प्लेक्स (पवई) - 65 एकर


आरेमधील एकूण झाडांची संख्या 4.8 लाख
आरेमध्ये होणारी वृक्षतोडीची संख्या - 2185
मेट्रो 3 साठी आवश्यक जागा - 30 हेक्टर
पुनर्रोपण करण्यात येणार्‍या झाडांची संख्या- 461
पुनर्रोपण करण्यात आलेली झाडे -1045
नव्याने लावण्यात येणार असलेली झाडे - 13 हजार
आरेमध्ये आतापर्यंत झालेले जमीनीचे अधिग्रहण - 333.50 हेक्टर
आरे कॉलनीची एकूण जागा - 1281 हेक्टर
आरे कॉलनीतील विदेशी झाडांचे प्रमाण - 40 टक्के