मुंबई : बारावीच्या परीक्षेला आजपासून सुरुवात झाली आहे. राज्यात आज पहिल्यांदा एका दृष्टीहीन विद्यार्थ्याने कॉम्प्युटरवर बारावी परीक्षेचा पेपर सोडवला. दहावी आणि बारावीच्या परीक्षेला दिव्यांग विद्यार्थ्यांना विशिष्ट प्रकारच्या सवलती दिल्या जातात. आतापर्यंत दहावी, बारावीच्या परीक्षेत दिव्यांग विद्यार्थ्यांना आपल्यासोबत पेपर लिहिण्यासाठी रायटर उपस्थित राहू शकत होता. मात्र आता काळानुरुप यामध्ये तंत्रज्ञान वापरुन कॉम्प्युटरद्वारे मुंबई विभागाने ही सोय विद्यार्थ्याला करुन दिली आहे.


मागील वर्षी बारावीच्या एका सोफिया कॉलेजच्या विद्यार्थिनीने टॅबवरुन परीक्षा दिली होती. त्यानंतर यावर्षी एका दृष्टिहीन विद्यार्थ्याला कॉम्प्युटरच्या माध्यमातून परीक्षा देण्यास मुभा देण्यात आली. कांदिवलीच्या टी. पी. भाटिया ज्युनिअर कॉलेजमध्ये विज्ञान शाखेच्या भाव्य शहा या दृष्टिहीन विद्यार्थ्याला कॉम्प्युटरच्या माध्यमातून परीक्षा देण्यास मुभा मिळावी, अशी मागणी कॉलेजने केली होती. ती राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या मुंबई विभागातर्फे मान्य करण्यात आली.


ऑल द बेस्ट....बारावी परीक्षेला आजपासून सुरुवात!



यासाठी खास दृष्टिहीन विद्यार्थ्यांसाठी वापरण्यात येणाऱ्या 'नॉन व्हिज्युअल डेस्कटॉप अॅक्सेस' (एनव्हीडीए) या सॉफ्टवेअरचा यामध्ये वापर करण्यात आला आहे. एनव्हीडीए हे खास दृष्टिहीनांसाठी विकसित करण्यात आलेले सॉफ्टवेअर आहे. यामध्ये ई-स्पीक हे विशेष तंत्रज्ञान वापरले जाते. याद्वारे कॉम्प्युटरच्या स्क्रीनवरील मजकूर वाचून दाखवला जातो. तसेच ब्रेललिपी वाचणेही या सॉफ्टवेअरमध्ये शक्य होते. याशिवाय मायक्रोसॉफ्टच्या सर्व सॉफ्टवेअरमध्ये याचा वापर केला जातो. यामुळे या विद्यार्थिनीला परीक्षा देताना याची विशेष सुविधा व्हावी म्हणून कॉम्प्युटरमध्ये या सॉफ्टवेअरचा समावेश असण्याची अट देण्यात आल्याचं मुंबई मंडळाचे विभागीय सचिव संदीप संगवे यांनी सांगितलं.

बीडमध्ये बारावीच्या विद्यार्थ्यांचे हाल, जमिनीवर बसून परीक्षा देण्याची वेळ


विद्यार्थ्यांसोबत एक रीडर असणार आहे, जो प्रश्नपत्रिकेतील प्रश्न विद्यार्थ्याला वाचून दाखवेल. त्यानंतर प्रश्न ऐकून हा विद्यार्थी उत्तर पत्रिका कॉप्युटरवर टाईप करेन. जे काही हा विद्यार्थी कॉप्युटरवर टाईप करतो, ते सगलं तो ऐकू शकणार आहे. त्यामुळे टाईप करताना त्याच्याकडून चूक होणार नाही.


परीक्षेच्यावेळी कॉम्प्युटरवर कोणत्याही प्रकारची इंटरनेट जोडणी असणार नाही. तसेच केंद्र संचालकांना कॉम्प्युटरमध्ये परीक्षेशी संबंधित कोणताही मजकूर असणार नाही. या विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकांची प्रिंट काढून त्यावर बारकोड लावला जाईल. तसेच त्यावर परीक्षार्थी आणि केंद्र संचालकांची स्वाक्षरी घेतली जाईल. ही उत्तरपत्रिका सोडवल्यानंतर त्याची पीडीएफ फाईल तयार केली जाते. तसेच उत्तरपत्रिकेची प्रिंट काढल्यानंतर ती कॉम्प्युटरवरुन डिलिट करण्यात येईल. मुंबई बोर्डाने दिलेल्या सुविधेचा भविष्यात इतर दिव्यांग दृष्टिहीन विद्यार्थ्यांना देखील फायदा होणार आहे.