मुंबई : एखादं आत्मचरित्रावर आधारीत पुस्तक प्रकाशित होण्याआधी वादाच्या भोवऱ्यात सापडणं काही नवीन गोष्ट नाही. अशा पुस्तकांतील बऱ्याचदा असेच मजकूर जाहीर केले जातात ज्यावरून चर्चा होईल. सहाजिकच याचा परिणाम पुस्तकाच्या विक्रीवर होत असतो. मुंबई पोलीस आणि गुन्हेगारी जगतावर आजवर अनेक पुस्तकं प्रकाशित झाली. मात्र 90 च्या दशकांत बाबरीच्या पतनानंतर मुंबईत उसळलेल्या दंगली, त्यानंतरचे साखळी बॉम्बस्फोट, त्यांचा रोमहर्षक तपास, 26/11 चा मुंबईवरील दहशतवादी हल्ला, गुरूनाथ मयप्पनचं आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरण ते अलिकडच्या काळातील शीना बोरा हत्याकांड असा सारा प्रवास आता एकाच पुस्तकात उपलब्ध झाला आहे. मुंबई पोलीस दलात एकेकाळी 'सुपरकॉप' अशी ओळख असलेल्या राकेश मारिया यांचं 'लेट मी से इट नाऊ' हे आत्मचरित्र नुकतंच प्रकाशित झालं आहे. मात्र या पुस्तकात त्यांनी शीना बोरा प्रकरणावरून पोलीस दलातील आपल्याच सहाकाऱ्यांवर केलेल्या आरोपांची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे.


राकेश मारिया यांनी आपल्या पुस्तकात शीना बोरा हत्याकांड संदर्भात म्हटलंय की, पीटर मुखर्जीनं शीना गायब झाल्याची माहिती देवेन भारती यांना दिली होती. मात्र भारती यांनी ही माहिती आपल्यापासून दडवून ठेवली. याबाबत आपण त्यांना विचारलं असताही त्यांनी मौन बाळगणं पसंत केलं. त्यामुळे कदाचित तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत चुकीची माहिती गेल्याचा आरोप मारिया यांनी केला आहे. त्याचबरोबर अहमद जावेद यांनीही एका ईदच्या कार्यक्रमाला पीटर मुखर्जीला आमंत्रित केलं होतं. त्याकडे मात्र कुणीही लक्ष दिलं नाही, असाही दावा त्यांनी या पुस्तकात केला आहे. शीना बोरा प्रकरणात उगाच जातीनं लक्ष घालून राकेश मारिया मुख्य आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप होऊ लागल्यानं राकेश मारिया यांची तडकाफडकी बदली करण्यात आली.

सुपर कॉप राकेश मारिया यांच्या पुस्तकाने खळबळ, खाकीतलं राजकारण समोर!



 पुस्तकातून या गोष्टी प्रकाशित होताच त्यावर संबंधित व्यक्तींच्या प्रतिक्रिया येणंही स्वाभाविकच होतं. देवेन भारती यांनी स्पष्ट केलंय की, "बॉलिवूडशी संबंधित कुटुंबाशी मारिया यांचा जवळचा संबंध असल्यामुळेच कदाचित पटकथा लेखनाचा हा प्रभाव असावा. वस्तुस्थितीपेक्षा प्रसिद्धी मिळविण्याच्या हव्यासापोटी विपणनासाठी हे केले असावे. तथापि एक पोलीस अधिकारी म्हणून काल्पनिकतेपेक्षा आरोपपत्र आणि केस डायरी वाचायला हवी होती. खटला सुरू असल्याने अधिक भाष्य करणे योग्य नाही. तपास पथकाला तपशिलाची संपूर्ण माहिती आहे. मुंबई पोलिसांकडे तपास होता तेव्हा वस्तुस्थिती तशीच होती".





ज्या के.पी बक्षी यांनी राकेश मारिया यांच्या बदलेचे आदेश काढले होते, त्यांनी 'एबीपी माझा'कडे प्रतिक्रिया देताना म्हटलंय की, "कोणत्याही अधिकाऱ्याला बदलीनंतर वाईट वाटणं स्वाभाविक आहे. आपल्याला अजून थोडा कालावधी मिळायला हवा होता असं प्रत्येक सरकारी अधिकाऱ्याला वाटत असतं, त्यात गैर असं काहीच नाही. मात्र प्रशासनाची आपली काही कारणं असतात, शेवटी कोणताही निर्णय विनाकारण तर होत नसतो". असं सूचक विधान त्यांनी केलं.

शीना बोरा हत्याकांड प्रकरण; पीटर मुखर्जीला हायकोर्टाकडून जामीन मंजूर


अहमद जावेद यांनी मात्र मारिया यांच्या आरोपांबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. "प्रत्येक गोष्टीला एक कायदेशीर प्रक्रिया असते, त्यावेळी कायदा आणि सुव्यवस्था विभागाची जबाबदारी कुणाकडे होती हे सहज तपासता येईल. अश्याप्रकारची विधान करण्याआधी त्यांनी किमान सत्यता तपासायला हवी होती. हे गोष्ट खरंच खेदजनक आहे, मात्र अश्यावेळी तुम्ही त्यांच्याकडनं काय अपेक्षा ठेवणार."



तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे. मात्र राकेश मारिया यांच्या या पुस्तकानं पोलीस प्रशासनात मात्र दिसतं तसं सारं काही आलबेलं नसतं हे पुन्हा एकदा अधोरेखित केलं आहे.

(ऋत्विक भालेकर आणि गणेश ठाकूरसह अमेय राणे)