मुंबई : देशभरात सध्या #MeToo ही मोहीम चर्चेत आहे. सिनेसृष्टी, क्रीडा क्षेत्र एवढंच नाही तर राजकारणही या मोहीमेपासून दूर राहू शकलं नाही. अनेक क्षेत्रातील सक्षम महिलांना आपल्यावरील अन्यायाविषयी बोलण्यासाठी कित्येक वर्ष लागली. शहराच्या तुलनेत ग्रामीण भागातील अन्यायाबद्दल बोलण्यासाठी मुली/स्त्रिया त्वरित पुढे येत नाहीत. पण शहरी किंवा ग्रामीण भागातील महिलांमधील सुरक्षिततेची भावना वाढण्यासाठी काय करायला हवं? याविषयी वाशिमच्या पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी माहिती दिली आहे. एबीपी माझाच्या 'ब्रेकफास्ट न्यूज'मध्ये त्यांनी विविध विषयांवर बातचीत केली.


त्या म्हणाल्या की, "अन्याय हा अन्याय असतो, अन्यायाला वाचा न फोडणे ही सुद्धा त्या अन्यायाला किंवा गुलामगिरीला साथ देण्यासारखी गोष्ट आहे.आपण वरिष्ठांना सांगू शकत नाही किंवा पोलिसांत जाऊ शकत नाही, असं जर आपल्याला वाटत असेल, तर आपण अन्यायाला वेगवेगळ्या मार्गाने वाचा फोडू शकतो."

कुटुंबाची साथ महत्त्वाची
"आपण आपल्या कुटुंबीयांना सांगू शकतो, मित्र-मैत्रिणींना सांगू शकतो. आईवडील, कुटुंबाने मुलीच्या किंवा ज्याच्यावर अन्याय होत असेल त्याच्या साथीला आलं पाहिजे. ज्या व्यक्तीवर अन्याय होतोय ती चूक नाही, तर त्या व्यक्तीबरोबर चूक घडलं आहे, हे आपण सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे," असं पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी नमूद केलं.

ऑनलाईन पोर्टलवर तक्रार द्या
तक्रार कुठे नोंदवता येईल, याबाबत मोक्षदा पाटील म्हणाल्या की, "महाराष्ट्र पोलिसांनी 'आपले सरकार' हे पोर्टल सुरु केलं आहे. तसंच वेगवेगळी सिटीझन ऑनलाईन पोर्टल आहेत, त्यावर आपली तक्रार नोंदवू शकता. या तक्रारींची सर्वच अधिकाऱ्यांना दखल घेणं भाग आहे. वरिष्ठ स्तरावरुन त्याचा आढावा घेतला जातो."

त्रास होतो, पण खमके राहा
"अन्यायाला वाचा फोडणं हे सोप नसतं. त्याचा आपल्याला पण थोडा त्रास होतो. पण तेवढं खमकं आपल्याला राहायला हवं, त्यामुळे आपल्याला मदत करणारे, समजून घेणारे लोक मिळतात," असंही मोक्षदा पाटील यांनी सांगितलं.

पाहा संपूर्ण व्हिडीओ