मुंबई : घरात एकटी महिला असल्याचं हेरत चोरीच्या उद्देशाने घरात घुसून पैसे लुटण्याचा प्रयत्न करणाऱ्या टोळीला पोलिसांनी अटक केली आहे. मुंबईच्या जोगेश्वरी पोलीस ठाण्याच्या ही घटना घडली. या घटनेत संबंधित महिला जखमी झाली आहे. विक्रम शिवनाथ यादव, अजय राजेंद्र यादव आणि राजेश गुज्जू यादव अशी आरोपींची नावं आहेत. आरोपींपैकी विक्रम शिवनाथ यादव हा मेडिकलचा मालक असून तर दुसरा आरोपी इंटिरिअर डिझायनर आहे. तर तिसरा आरोपी सध्या शिकत आहे.
जोगेश्वरीच्या सॅटेलाईट पार्क इमारतीमध्ये सुशीला यादव आपल्या डॉक्टर पतीसह राहतात. डॉक्टर राजेश यादव सकाळी अकरा वाजता आपल्या क्लिनिकमध्ये गेले. त्यानंतर दुपारी दोनच्या सुमारास सुशीला घरी एकट्या असताना दारावरची बेल वाजली. त्यावेळी एक कुरिअर बॉय दिसला. 'तुमचं पार्सल आहे,' असं त्याने सांगितलं. परंतु मी कोणतंही पार्सल मागवलेलं नाही, असं सुशीला यांनी सांगितलं. त्यावर 'सरांचं पार्सल आहे' असं सांगून त्याने दार उघडायला लावलं. सही घेण्यासाठी कुरिअर बॉयने पेन दिला. पण तो लिहित नव्हता. त्यावर तुम्हीच पेन द्या, असं तो म्हटल्यानंतर सुशीला यादव पेन आणण्यासाठी गेल्या. हीच संधी साधून आरोपीने घरात आला आणि त्याकडील चाकू काढला.
सुशीला यादव यांनी चोराला बाहेर ढकलण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याने जबरदस्तीने ड्रॉवरमध्ये ठेवलेले 1,050 रुपये चोरले. या झटापटीत आरोपींनी चाकूने वार करत सुशीला यांना जखमी केलं. त्यांचा आरडाओरडा ऐकून शेजारी मदतीला धावले. या कुरिअर बॉयसोबत आणखी एक जण आला होता. शेजारी आणि सुरक्षारक्षकाने एका आरोपीला पकडलं. यानंतर सुशीला यांनी जोगेश्वरी पोलीस ठाण्यात संबंधित प्रकाराची तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी तांत्रिकदृष्ट्या तपास करुन उर्वरित दोन आरोपींना पकडलं. जोगेश्वरी पोलीस अधिक तपास करत आहेत.