Mumbai Measles Disease Update : मुंबईकरांची (Mumbai News) चिंता वाढवणारी बातमी. मुंबईत आधीच गोवरचा प्रादुर्भाव (Measles Disease) वाढताना दिसत आहे. यामध्ये अनेक बालकं दगावली आहेत. पण येत्या काळात देशाच्या आर्थिक राजधानीवरचं गोवरचं संकट आणखी गडद होण्याची भीती निर्माण झाली आहे. कारण मुंबईत बालकांप्रमाणे प्रौढांमध्येही गोवरची लक्षणं आढळून आली आहेत. मुंबईत 18 आणि 22 वर्ष वयोगटातील दोघांची गोवरचे संशयित रुग्ण म्हणून नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे लहान मुलांमध्ये पसरलेला गोवर आता प्रौढांमध्येही पसरणार का? असा प्रश्न निर्माण होत आहे. अशातच मुंबईकरांनी सतर्क राहून काळजी घेण्याचं आवाहन महापालिकेच्या वतीनं करण्यात आलं आहे. 


मुंबईत एम पूर्व प्रभागांमध्ये 18 आणि 22 वर्षांच्या दोघांची गोवराचे संशयित रुग्ण म्हणून महापालिककडे नोंद करण्यात आली आहे. हे दोन्ही रुग्ण अंगावरील पुरळ आणि ताप येण्याच्या तक्रारीसाठी खासगी डॉक्टरांकडे गेले होते. या रुग्णांची लक्षणं लक्षात घेऊन त्यांच्यावर औषधोपचार करण्यात आले. तसेच, त्यांना 'अ' जीवनसत्त्वही देण्यात आलं. दरम्यान, सध्या या दोन्ही रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे. 


जागतिक आरोग्य संघटनेनं दिलेल्या माहितीनुसार, ज्या भागांमध्ये गोवराच्या संशयित रुग्णांमध्ये अंगावर पुरळ, ताप अशी लक्षणं दिसून येतात. अशा परिसरातील पाच नमुने वैद्यकीय विश्लेषणासाठी पाठवण्यात येतात. मान्यताप्राप्त प्रयोगशाळांमध्ये पाचपैकी दोन नमुन्यांमध्ये गोवर असल्याचे निष्पन्न झाल्यास या परिसरात गोवराचा उद्रेक असल्याचं घोषित केलं जात असल्याची माहिती तज्ज्ञांनी दिली आहे. या परिसरामध्ये गोवराचा प्रादुर्भाव होत असल्याचे निश्चित झाल्यानंतर तेथील नमुने पुन्हा वैद्यकीय विश्लेषणासाठी पाठवण्यात येत नाहीत. त्यानंतर येणारे सर्व रुग्ण हे गोवरासाठी संशयित असल्याचं मानलं जातं, असंही तज्ज्ञांनी सांगितलं. 


सामाजिक प्रबोधन करणाऱ्यासाठी महापालिकेचा मास्टर प्लान 


मुंबईत गोवरचा प्रादुर्भाव वाढत असताना मुंबई महापालिकेकडून सामाजिक प्रबोधन करणाऱ्या प्रतिष्ठित व्यक्तींना आणि मौलवींना जनजागृतीचं आवाहन करण्यात आलं होतं. गोवंडी परिसरात लसीकरणाचा वेग वाढावा यासाठीही प्रयत्न झाल्याचं पाहायला मिळालं. मुंबईत गोवरचा विळखा अधिक प्रमाणात आहे. अशात मुंबई महापालिकेनं गोवरचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मौलवींना आवाहन केलं आहे. मात्र, लस पात्र वयाआधीच गोवरची लागण होत असल्यानं चिंतेत आणखीच भर पडली आहे. यामुळं काल लसीकरणाविषयी जाणीवजागृतीसाठी विविध धर्मगुरूंची मदत घ्यावी, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील दिले आहेत.