मुंबई : दोन वर्षांपूर्वी दक्षिण आफ्रिकेतून प्रत्यार्पण करून भारतात आणलेल्या कुख्यात गुंड रवी पुजारीला मंगळवारी मुंबईतील विशेष मोक्का न्यायालयाने 15 मार्चपर्यत दिवसांची पोलीस कोठडीत वाढ केली. दरम्यान, आपल्याला काही गोष्टींची तपास अधिकाऱ्यांना माहिती द्यायची असल्याचं रवी पुजारीने न्यायालयात सांगतिले. 2016 मध्ये विलेपार्ले येथील हॉटेल गजाली येथे खंडणीसाठी आलेल्या त्याच्या साथीदाराने एका व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या होत्या. याप्रकरणी खंडणीविरोधी पथकाने 8 जणांना अटक करून त्यांच्याविरोधात न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. प्रकऱणातील मुख्य फरार आरोपी असलेल्या रवी पुजारीला ताब्यात घेण्यासाठी खंडणीविरोधी पथकाने न्यायालयात प्रत्यार्पणचा अर्ज दाखल केला होता.
रवी पुजारीला ताब्यात घेण्यात आल्यानंतर विशेष मोक्का न्यायालयाने 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. हा कालावधी संपत असल्यामुळे मंगळवारी विशेष मोक्का न्यायालयाचे न्यायाधीश डी. ई कोथळीकर यांच्यासमोर सुनावणी पार पडली. पुजारीकडून अद्याप चौकशी सुरू आहे. तसेच त्याचा जबाब नोंदवण्याचे काम सुरू असल्याने कोठडीचा कालावधी वाढवून देण्यात यावा, अशी मागणी पोलिसांच्या वतीने करण्यात आली. मात्र, त्याला पुजारीच्या वकिलांकडून विरोध करण्यात आला. चौकशी तसेच जबाब नोंदवण्यासाठी पोलिसांना पुरेसा वेळ मिळाला असून अधिक कोठडीची गरज नसल्याचा दावाही त्यांनी केला. मात्र पुजारीने स्वत: कोर्टाला सांगितलं की, त्याला मुंबई पोलिसांना काही महत्त्वाच्या गोष्टी सांगायच्या आहेत. त्याची दखल घेत न्यायालयाने 15 मार्चपर्यंत पुजारीच्या पोलीस कोठडीत वाढ केली.
कोण आहे रवी पुजारी?
रवी पुजारी हा मूळचा कर्नाटकच्या उडपी जिल्ह्यातील मालपे येथे राहत होता. 1990 मध्ये त्याने गँगस्टर छोटा राजन टोळीसाठी काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्याने स्वत:ची गुन्हेगारी टोळी बनवली. पुजारीने मुंबई, बंगळुरु आणि मंगळुरु येथे वेगवेगळ्या क्षेत्रातील व्यावसायिक, बॉलिवूडमधील प्रसिद्ध व्यक्तींना खंडणीसाठी धमकावण्यास व हस्तकांमार्फत त्यांच्यावर जीवघेणे हल्ले करण्यास सुरुवात करुन आपल्या टोळीची दहशत निर्माण केली.
प्रसिद्ध दिग्दर्शक महेश भट आणि अली मोरानी यांच्या हत्येचा कट रचल्याचाही पुजारीवर आरोप आहे. मुंबई प्रमाणे देशभरात रवी पुजारी याच्यावर गुन्हे दाखल आहेत. परदेशात बसून रवी पुजारी आपल्या हस्तकांमार्फत भारतामध्ये टोळी चालवत होता. रवी पुजारी हा दक्षिण आफिका येथील सेनेगल पोलिसांच्या ताब्यात असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्याचे प्रत्यार्पण करण्यासाठी केंद्रीय यंत्रणांनी सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली. दोन वर्षांपूर्वी त्याला भारतामध्ये आणण्यात आले. सुमारे 90 पेक्षा अधिक गुन्हे कर्नाटकमध्ये दाखल असल्याने भारतात आणल्यानंतर त्याचा ताबा प्रथम कर्नाटक पोलिसांना देण्यात आला. जानेवारी 2019 मध्ये रवी पूजारीला सेनेगल पोलिसांनी एका सलूनमधून अटक केली होती. सेनेगल मध्ये रवी पुजारी अँथोनी फर्नांडिस या नावाने राहत होता, त्याची हॉटेल्सची चेन होती. 'नमस्ते इंडिया' असं त्याच्या हॉटेलचे नाव असून एकूण 9 हॉटेल्स रवी पुजारी चालवत होता.