मुंबई: दोन वर्षांपूर्वी दक्षिण आफिकेतील सेनेगलमधून प्रत्यार्पण करुन भारतात आणलेल्या गँगस्टर रवी पुजारीचा ताबा मिळविण्यात अखेर मुंबई पोलिसांना यश आले आहे. बंगळुरु येथील न्यायालयाने कोठडी मंजूर केल्यामुळे गुन्हे शाखेचे पथक कर्नाटक पोलिसांकडून ताबा घेऊन आज सकाळी मुंबईत दाखल झाले. रवी पुजारीला नऊ मार्चपर्यंत पोलीस कस्टडी मिळाली आहे.
रवी पुजारी याच्यावर मुंबईत सुमारे 49 गुन्हे दाखल असून अनेक बड्या आणि प्रसिद्ध व्यक्तींना त्याने खंडणीसाठी धमकावले आहे. त्याचा ताबा मिळाल्याने मुंबई पोलिसांना मिळाल्याने अनेक गुंतागुंतीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. रवी पुजारीवर कर्नाटकात आणि महाराष्ट्रात अनेक गुन्हे दाखल आहेत. त्याची एकेकाळी सिनेमा आणि व्यापारी जगतात मोठी दहशत होती.
गुन्ह्याच्या विश्वात असा एकही गंभीर गुन्हा नसेल जो रवी पुजारीने केला नसेल. फक्त भारतामध्येच रवी पुजारीवर 200 पेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत. रवी पुजारी याच्याविरोधात मुंबईत सुमारे 49 गुन्हे दाखल असून त्यापैकी 26 गुन्ह्यांमध्ये 'मोक्का' लावण्यात आला आहे. 2016 मध्ये विलेपार्लेच्या गजाली हॉटेलबाहेर खंडणीसाठी गोळीबार करण्यात आला होता. याप्रकरणी खंडणी विरोधी पथकाने 7 जणांना अटक करून आरोपपत्र दाखल केलं आहे.
कोण आहे रवी पुजारी?
रवी पुजारी हा मूळचा कर्नाटकच्या उडपी जिल्ह्यातील मालपे येथे राहत होता. 1990 मध्ये त्याने गँगस्टर छोटा राजन टोळीसाठी काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्याने स्वत:ची गुन्हेगारी टोळी बनवली. पुजारीने मुंबई, बंगळुरु आणि मंगळुरु येथे वेगवेगळ्या क्षेत्रातील व्यावसायिक, बॉलिवूडमधील प्रसिद्ध व्यक्तींना खंडणीसाठी धमकावण्यास व हस्तकांमार्फत त्यांच्यावर जीवघेणे हल्ले करण्यास सुरुवात करुन आपल्या टोळीची दहशत निर्माण केली.
प्रसिद्ध दिग्दर्शक महेश भट आणि अली मोरानी यांच्या हत्येचा कट रचल्याचाही पुजारीवर आरोप आहे. मुंबई प्रमाणे देशभरात रवी पुजारी याच्यावर गुन्हे दाखल आहेत. परदेशात बसून रवी पुजारी आपल्या हस्तकांमार्फत भारतामध्ये टोळी चालवत होता. रवी पुजारी हा दक्षिण आफिका येथील सेनेगल पोलिसांच्या ताब्यात असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्याचे प्रत्यार्पण करण्यासाठी केंद्रीय यंत्रणांनी सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली. दोन वर्षांपूर्वी त्याला भारतामध्ये आणण्यात आले. सुमारे 90 पेक्षा अधिक गुन्हे कर्नाटकमध्ये दाखल असल्याने भारतात आणल्यानंतर त्याचा ताबा प्रथम कर्नाटक पोलिसांना देण्यात आला.
जानेवारी 2019 मध्ये रवी पूजारीला सेनेगल पोलिसांनी एका सलूनमधून अटक केली होती. सेनेगल मध्ये रवी पुजारी अँथोनी फर्नांडिस या नावाने राहत होता, त्याची हॉटेल्सची चेन होती. 'नमस्ते इंडिया' असं त्याच्या हॉटेलचे नाव असून एकूण 9 हॉटेल्स रवी पुजारी चालवत होता.
बँक कर्मचारी असल्याचं सांगत केलं लग्न, मात्र तो करायचा बँकेत चोरी! पकडल्यावर मिळाला चोप