मुंबई : माटुंगा पोलिसांनी एका नामांकित बँकेच्या असिस्टंट मॅनेजरला आपल्या प्रियकराची सुपारी देताना अटक केली आहे. अटक केलेल्या महिलेचा प्रियकर मुंबई महानगरपालिकेच्या एका वॉर्ड ऑफिसमध्ये सब इंजिनिअर म्हणून कार्यरत आहे. पोलिसांनी जर ही अटक केली नसती तर सब इंजिनीयरची आत्तापर्यंत हत्या झाली असती. विशेष म्हणजे तिघेही उच्चशिक्षित आहेत. आरोपी महिला मुंबईच्या नामवंत बँकेमध्ये गेल्या चार वर्षापासून असिस्टंट मॅनेजर आहे. ज्याला सुपारी दिली तो केमिस्ट्रीमध्ये बीएससी आहे तर ज्याला मारणार होते तो मुंबई महानगरपालिकेमध्ये सब इंजिनियर आहे.


मॅनेजर आणि सब इंजिनियर या दोघांमध्ये प्रेमसंबंध होते, मात्र दोघांचाही लग्न झालं होतं. लग्नानंतर सुद्धा इंजिनियरने आपल्याशी प्रेम संबंध ठेवावा म्हणून ही मॅनेजर त्याच्या पाठीमागे तकादा लावत होती. सुरवातीला काही दिवस असेच गेले मात्र याला कंटाळून या इंजिनिअरने मॅनेजरला ब्लॉक केलं आणि सगळे संपर्क बंद करून टाकले.


मॅनेजरला याचा प्रचंड राग आला आणि तिने ओरीसा मधून एका कॉन्ट्रॅक्ट किलरला एक लाख रुपयांमध्ये इंजिनीअरची हत्या करण्यासाठी सुपारी दिली. ओरिसाचा हा किलर रविवारी दादर दादर स्टेशन येथे आला. जिथे ती मॅनेजर त्याला सब इंजिनियरची हत्या करण्यासाठी बंदूक आणि पाच गोळ्या देणार होती. मात्र माटुंगा पोलीसांनी वेळेत दोघांनाही अटक केलं.


मॅनेजर आणि सब इंजिनियर दोघांचही वेगवेगळ्या ठिकाणी लग्न झालं होतं. मात्र लग्नानंतर ही दोघं एकमेकांच्या संपर्कात आले आणि त्यांच्यात प्रेम संबंध निर्माण झाले. काही दिवसानंतर सब इंजिनीयरला हे नातं कायम ठेवणं जड जाऊ लागलं ज्यामुळे त्याने हे नातं तोडण्याचा निर्णय घेतला. मात्र महिला मॅनेजरने यासाठी नकार दिला आणि हे नातं सुरू ठेवण्यास तगादा लावला. पण इंजिनियर आपल्या निर्णयावर ठाम होता आणि याचाच राग आणि विचार सतत त्या महिला मॅनेजरच्या मनात होता. या दोघांमध्ये असं काय झालं की ही महिला हत्या करण्याच्या टोकापर्यंत पोहोचली ? महिला मॅनेजरने नेमका त्या किलरशी कसा आणि कोणाच्या माध्यमातून संपर्क केला ? तसेच बंदुक आणि गोळ्या महिला मॅनेजरला कोणी आणि कुठून आणून दिले याचा तपास पोलीस करत आहेत.


ही कारवाई पोलीस उपायुक्त विजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सहायक पोलिस आयुक्त भीमराव इंदलकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय सिंह घाटगे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उप निरीक्षक भरत गुरव, पोलीस नाईक पाल, पवार, मुंडे, मोरे, पोलीस शिपाई जरड, शेलारआणि महिला पोलीस शिपाई परब आणि मोसमकर या पथकाकडून करण्यात आली.