मुंबई : यंदा बारामतीमध्ये परंपरेनुसार दिवाळी सण एकत्रित साजरा न करण्याचा निर्णय पवार कुटुंबाने घेतला आहे. कोरोना संसर्ग टाळण्यासाठी यंदा सामूहिक दिवाळी कार्यक्रम रद्द केल्याचं पवार कुटुंबाकडून सांगण्यात आलं. यंदा सामूहिक दिवाळी साजरी न करण्याचा निर्णय पवार कुटुंबियांनी घेतला आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार आणि पवार कुटुंबियांच्या वतीने संयुक्त निवेदन प्रसिद्ध करण्यात आलं आहे.


दरवर्षी दिवाळीला पवार कुटुंबीय बारामतीत येऊन बारामतीकरांसह एकत्रितपणे दिवाळी साजरा करतात. पाडव्याला राज्यभरातून सहकारी, हितचिंतक, सामान्य नागरिकबारामतीत येऊन पवार कुटुंबियांना भेटून त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देतात. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा हा कार्यक्रम रद्द करावा लागत असल्याचं सांगून कुटुंबीयांनी याबाबत दिलगिरी व्यक्त केली आहे.


दिवाळीला भेटण्यासाठी यंदा बारामतीला न येता आपापल्या घरुनच शुभेच्छा द्याव्यात. कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करत आपापल्या घरीच सुरक्षित दिवाळी साजरी करावी, असं आवाहन पवार कुटुंबीयांनी केलं. तसंच कोरोनाला हरवल्यानंतर पुढची दिवाळी मात्र, पारंपरिक उत्साहात, जल्लोषात बारामतीला एकत्रित येऊन साजरी करुया, असंही पवार कुटुंबीयाने सांगितलं.


"हा कार्यक्रम सर्वांचा आनंद, उत्साह वाढवणारा असतो. आस्था, आपुलकी, स्नेहपूर्ण वातावरणात होणाऱ्या या कार्यक्रमाची ओढ आपल्या सर्वांनाच असते. परंतु, कोरोना संकटकाळात नागरिकांच्या जीवाचा धोका टाळण्यासाठी अनेक दशकांची सामूहिक दिवाळीची परंपरा यंदा खंडित करावी लागत आहे. त्यामुळे इच्छा असूनही यंदा भेटता येणार नाही, याचं दु:ख निश्चितच आहे. परंतु, कोरोना प्रतिबंधक नियमांचे काटेकोर पालन करायचे असल्याने, कोरोनाला लवकरात लवकर हरवण्याचा निर्धार असल्याने आपल्याला यावर्षी एकत्र येता, भेटता येणार नाही, हे समजून घेतले पाहिजे. कोरोनाला हरवण्यासाठी आणखी काही काळ संयम आणि नियम पाळावे लागतील. त्यामुळे यंदाची दिवाळी आपण सर्वांनी आपापल्या घरी, कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करुन सुरक्षितपणे साजरी करुया. स्वत:ला, कुटुंबाला, समाजाला सुरक्षित ठेवूया, असं आवाहन पवार कुटुंबीयांनी राज्यातील जनतेला केलं. तसंच दिवाळीच्या, नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या.