![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
पालघर जिल्ह्यात पुन्हा माता मृत्यूची चिंता, गेल्या सात वर्षातील सर्वाधिक नोंद, मागील वर्षी 20 मातांचा मृत्यू
पालघर जिल्हा स्थापनेपासून ते आतापर्यंत जिल्ह्यामध्ये सर्वाधिक माता मृत्यूची नोंद गेल्या वर्षी (2021-2022) मध्ये झाली आहे. गेल्या वर्षी जिल्ह्यात विविध कारणामुळे 20 माता मृत्यूची नोंद झाली आहे.
![पालघर जिल्ह्यात पुन्हा माता मृत्यूची चिंता, गेल्या सात वर्षातील सर्वाधिक नोंद, मागील वर्षी 20 मातांचा मृत्यू Maternal death increased in Palghar district again, highest in last seven years, 20 maternal deaths last year पालघर जिल्ह्यात पुन्हा माता मृत्यूची चिंता, गेल्या सात वर्षातील सर्वाधिक नोंद, मागील वर्षी 20 मातांचा मृत्यू](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/13/c8f2bdc48644389dc110cb95b7bee422_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
पालघर : पालघर जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा नेहमीच कुचकामी ठरत असताना चित्र सध्याही जैसे थे आहे. नवीन पालघर जिल्ह्याची निर्मिती होऊनही आरोग्य, कुपोषण, माता मृत्यू, बेरोजगारी आणि इतर समस्याही जिल्ह्यातील नागरिकांना अजूनही तशाच भेडसावत आहेत. पालघर जिल्हा स्थापनेपासून ते आतापर्यंत जिल्ह्यामध्ये सर्वाधिक माता मृत्यूची नोंद गेल्या वर्षी (2021-2022) मध्ये झाली आहे. गेल्या वर्षी जिल्ह्यात विविध कारणामुळे 20 माता मृत्यूची नोंद झाली आहे. तर 294 बालमृत्यूची नोंद झाली आहे. बालमत्यूचा आकडा कमी होत असला तरी माता मृत्यूचा आकडा चिंताजनक आहे. याआधी 2017-18 मध्ये 19 माता मृत्यूंची नोंद झाली होती.
कुपोषणापाठोपाठ माता मृत्यूमुळे आरोग्य विभागाची चिंता वाढत आहे. तसेच गेल्या सात वर्षात सर्वाधिक माता मृत्यू झाल्यामुळे जिल्हा प्रशासनावर ताशेरे ओढले जात आहेत. माता मृत्यूमुळे पालघर जिल्हा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. मातांना योग्य आरोग्य सेवा न मिळाल्यामुळे हे माता मृत्यू होत आहेत, असे सांगितले जाते. याचबरोबरीने पालघर जिल्ह्यात ग्रामीण बहुल भागांमध्ये गरोदर मातांना असलेल्या रक्ताशय याबरोबर उच्च रक्तदाब, मुदतपूर्व प्रसूती, घरी प्रसुती करणे अशा कारणांमुळेही माता मृत्यूची नोंद झालेली आहे.
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत माता बाल संगोपन कार्यक्रमा अंतर्गत मातांची तपासणी व त्यांच्या आजाराच्या नोंदी ठेवल्या गेल्या असल्या तरी उपजिल्हा रुग्णालय यासह ग्रामीण रुग्णालयांमध्ये मातांना प्रसूतीसाठी योग्य त्या सेवा मिळाल्या नसल्यामुळे त्यांचे मृत्यू होत असल्याचे समोर येत आहे. रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्यामुळे माता मृत्यू झाल्याच्या घटनाही घडल्या आहेत. याच बरोबरीने शासकीय प्रसुतीगृहामध्ये अनेक कारणे सांगून महिलांना इतरत्र उपचारासाठी पाठवले जाते. त्या दरम्यान मातांचा मृत्यू झाल्याचेही कारण समोर आले आहे. एकंदरीत आरोग्य विभागाच्या काही अपयशामुळे माता मृत्यूचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून येते. कुपोषण निर्मूलनासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्न करत असले तरी मातामृत्यू थांबवण्यासाठी हे प्रयत्न कमी पडत असल्याचे आरोप काही सेवाभावी संस्थांकडून केले जात आहेत.
ग्रामीण बहुल भागांमध्ये काही गरोदर माता शासकीय आरोग्य संस्थांच्या कक्षेतून बाहेर राहत असल्याने त्यांच्या मृत्यूची नोंद किंवा त्यांची नोंद शासन दरबारी होत नाही. त्यामुळे मातामृत्यूचा आकडा वाढण्याची दाट शक्यता आहे. अलीकडच्या काळामध्ये कोरोना हे मातामृत्यू होण्याचे प्रमुख कारण आहे. आरोग्य विभागाचे संपूर्ण लक्ष कोरोनावर केंद्रित झाल्यामुळे माता यांच्यासाठी असलेल्या आरोग्य सेवांवर दुर्लक्ष झाले. परिणामी माता मृत्यू वाढत गेले. या दरम्यान शासकीय आरोग्य संस्थांमध्ये प्रसूतीसाठी मोजकीच रुग्णालय उपलब्ध असल्याने अनेक मातांना प्रसूतीसाठी फरपट करावी लागली. गेल्या सात वर्षांतील सर्वाधिक मातामृत्यू गेल्यावर्षी झाल्यामुळे ही बाब आरोग्य व्यवस्थेची झोप उडवणारी आहे मात्र आरोग्यव्यवस्था हवे तसे प्रयत्न करत असल्यामुळे मातामृत्यू होत असल्याचे आरोप केले जात आहे.
ग्रामीण भागांमध्ये बाल विवाह सारख्या अनिष्ट रुढी परंपरा अजूनही कमी झालेल्या नाहीत पालघर जिल्ह्यात गेल्या पाच वर्षात पाचशेहून अधिक बालविवाह झाल्याचे अलीकडे एका अहवालात म्हटले होते न्यायालयानेही या संदर्भात राज्य शासनाला फटकारले होते बाल विवाह मुळे कुपोषण आणि मातामृत्यूसारखे गंभीर परिणाम समोर येत आहेत.
ग्रामीण भागांमध्ये शिक्षण आणि प्रबोधन नसल्यामुळे बालविवाह फोफावत आहेत. याचे प्रमाण कमी करण्यासाठी लोकप्रतिनिधींसह जिल्हा परिषद त्यांच्यामध्ये जागरुकता आणून मातामृत्यू कमी करण्यासाठी निश्चित प्रयत्न करेल आणि तो आकडा कमी होईल अशी आशा आहे, असं पालघर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा वैदेही वाढाण यांनी म्हटलं आहे.
माता मृत्यू वर्षनिहाय
2014-15 - 16
2015-16 - 15
2016-17 - 18
2017-18 - 19
2018-19- 13
2019-20- 10
2020-21 - 12
2021-22 - 20
2021- 2022 मधील माता मृत्यू
जव्हार - 3
विक्रमगड - 2
वाडा - 3
पालघर - 5
तलासरी - 1
डहाणू - 5
वसई - 1
एकूण- 20
2021- 2022 चे बाल मृत्यू
मोखाडा - 17
जव्हार - 106
विक्रमगड - 32
वाडा - 23
पालघर - 36
तलासरी - 13
डहाणू - 59
वसई - 8
एकूण - 294
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)