मुंबई : गेल्या काही दिवसांपासून मुंबई पोलीस दलात बदलीचा धडाका सुरु आहे. याच सत्रामध्ये काही दिवसांपूर्वी सात मुंबई पोलीस दलातील पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. त्यामध्ये दया नायक यांच्या नावाचा सुद्धा समावेश होता. दया नायक यांची गोंदियामध्ये बदली करण्यात आली होती. मात्र याविरोधात दया नायक यांनी मॅट कोर्टात धाव घेतली होती. त्यानंतर मॅट कोर्टाकडून आज दया नाईक यांना दिलासा मिळाला असून त्यांच्या बदलीवर कोर्टाने स्थगती दिली आहे.
काही दिवसांपूर्वी मुंबई पोलीस दलातील पोलीस निरीक्षक नंदकुमार गोपाळे, दया नायक, राजकुमार कोथमिरे, सचिन कदम, केदारी पवार, सुधीर दळवी, नितीन ठाकरे या सर्व अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. मात्र या बदल्या नेहमी सारख्या बदल्या नसून परमबीर सिंह आणि देवेन भारती यांच्या मर्जीतील अधिकारी आहेत, म्हणून या सर्व अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या असल्याची चर्चा दबक्या आवाजात मुंबई पोलीस दलात सुरु आहे.
दया नायक यांची ओळख एक एन्काऊंटर स्पेशलिस्ट म्हणूनही आहे. दया नायक यांनी अनेक गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या असून अनेक एन्काऊंटरही केले आहेत. मात्र वरिष्ठांच्या मर्जीतील अधिकारी म्हणून त्यांची बदली गोंदियाला करण्यात आली होती. त्यामुळे दया नायक यांनी मॅट कोर्टात धाव घेतली होती.
मुंबई पोलीस आयुक्त पदाचा पदभार सांभाळताच हेमंत नगराळे यांनी मुंबई गुन्हे शाखेच्या 65 अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या होत्या. त्यानंतरच येणाऱ्या दिवसांमध्ये मुंबई पोलीस दलात अजून मोठ्या प्रमाणात बदल्या होणार असल्याची शक्यता वर्तवली होती. सचिन वाझे प्रकरणामुळे मुंबई पोलीस दलाची प्रतिमा मलीन झाली होती. ती प्रतिमा सुधारण्याची जबाबदारी हेमंत नगराळे यांनी घेत या बदल्या केल्याची चर्चा आहे.
परमबीर सिंह यांची चौकशी करण्यास असमर्थ; महाराष्ट्राचे डीजीपी संजय पांडेंचं गृहमंत्रालयाला पत्र
परमबीर सिंह यांची चौकशी करण्यास असमर्थ असलयाच्या आशयाचं पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी गृहमंत्रालयाला पत्र दिलं आहे. परमबीर सिंह यांच्या नव्या आरोपांनंतर संजय पांडे यांनी गृहमंत्रालयाला पत्र लिहिलं आहे. दरम्यान, महाराष्ट्रातील दोन पोलीस अधिकाऱ्यांनी परमबीर सिंह यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. यानंतर पोलीस महासंचालक संजय पांडे यांना याप्रकरणी चौकशी करण्याचे निर्देश देण्यात आले होते. मात्र आता संजय पांडे यांनी परमबीर सिंहांची चौकशी करण्यास असमर्थ असल्याचं पत्र गृहमंत्रालयाला लिहलं आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :