मुंबई : परमबीर सिंह यांची चौकशी करण्यास असमर्थ असलयाच्या आशयाचं पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी गृहमंत्रालयाला पत्र दिलं आहे. परमबीर सिंह यांच्या नव्या आरोपांनंतर संजय पांडे यांनी गृहमंत्रालयाला पत्र लिहिलं आहे. दरम्यान, महाराष्ट्रातील दोन पोलीस अधिकाऱ्यांनी परमबीर सिंह यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. यानंतर पोलीस महासंचालक संजय पांडे यांना याप्रकरणी चौकशी करण्याचे निर्देश देण्यात आले होते. मात्र आता संजय पांडे यांनी परमबीर सिंहांची चौकशी करण्यास असमर्थ असल्याचं पत्र गृहमंत्रालयाला लिहलं आहे.
राज्य सरकारनं परमबीर सिंह यांच्याविरोधात सुरु केलेल्या दोन प्रकरणांतील प्राथमिक चौकशीला परमबीर सिंह यांनी विरोध दर्शवला आहे. तसेच याविरोधात त्यांनी पुन्हा एकदा हायकोर्टाचे दरवाजे ठोठावले आहेत. त्यांनी यासंदर्भात नुकतीच एक याचिका दाखल केली आहे. या याचिकेत त्यांनी गंभीर आरोप केले आहेत. परमबीर सिंह यांनी यावेळी महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक संजय पांडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. परमबीर सिंह म्हणाले की, जर मी माजी गृहमंत्री अनिल देशमुखांविरोधातील तक्रार मागे घेतली, तर ते माझ्या विरोधात सुरु असलेली चौकशी मार्गी लावतील, असा दबाव टाकण्यात आला. यासंदर्भात परमबीर सिंह यांनी सीबीआयला देखील पत्र लिहिलं आहे.
मार्च महिन्यात मुंबई पोलीस आयुक्त पदावरून परमबीर सिंह यांची बदली होमगार्डच्या पोलीस महासंचालक पदावर करण्यात आली. त्यानंतर त्यांनी राज्याच्या गृहविभागाच्या कारभारवर बोट ठेवत तात्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले. त्यामुळेच आता त्यांना हा विनाकारण त्रास दिला जात आहे. इतकंच नव्हे तर त्यांच्यावरोधात एकापाठो पाठ एक गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचं सांगत त्यांच्यावर अनिल देशमुखांविरोधात लिहिलेलं ते पत्र मागे घेण्यासाठी प्रचंड दबाव टाकला जात असल्याचा आरोपही त्यांनी या याचिकेतून केला आहे.
दरम्यान, राज्य सरकारनं 1 एप्रिल आणि 20 एप्रिल रोजी राज्याचे पोलीस महालंचालक संजय पांडे यांना दोन प्रकरणांत माजी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांची चौकशी करण्याचे आदेश दिले होते. ज्यात 1 एप्रिलला तात्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ऑल इंडिया सर्विसच्या नियमावलीतील निर्देशांचा भंग केल्याबद्दल चौकशीचे आदेश दिले होते. तर 20 एप्रिलला राज्याचे विद्यमान गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी परमबीर सिंह यांच्याविरोधात असलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांत चौकशीचे आदेश दिले आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :