मुंबई : मेडिकल असोसिएशन ऑफ रेसिडन्ट डॉक्टर्स (मार्ड) संघटनेच्या शिष्टमंडळाने आपल्या विविध मागण्यांसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांची बैठक घेतली. याप्रसंगी शिष्टमंडळांने प्रामुख्याने कार्यक्षम सुरक्षा व्यवस्था, रहिवासी डॉक्टरांशी संबंधित सोयी सुविधा, सीसीटीव्ही यंत्रणा, विविध चाचण्यांच्या ठिकाणची रूग्णांच्या नातेवाईकांची गर्दी यासारख्या विषयांच्या अनुषंगाने सविस्तर चर्चा करण्यात आली. शिष्टमंडळाने केलेल्या सुचना आणि मागण्यांबाबत यावेळी सकारात्मक चर्चा झाली. तसेच शिष्टमंडळाने उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर प्राधान्याने उपाययोजना करण्यात येतील, असे अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त बांगर यांनी शिष्टमंडळाला आश्वस्त केले.
रूग्णालय परिसरात नेमण्यात येणारी सुरक्षा व्यवस्था ही कार्यक्षम असावी. तसेच एखाद्या घटनेला किंवा प्रसंगाला प्रतिसाद देण्याच्या अनुषंगाने सुरक्षा यंत्रणेच्या सहभाग तत्पर व प्रसंगावधान दाखवणारा अपेक्षित आहे. एखादी घटना किंवा प्रसंग घडल्यानंतर सुरक्षा अधिकारी यांनी आपली भूमिका कशा पद्धतीने बचावली, या गोष्टीचे नियमित ऑडिट होणे गरजेचे आहे. एखाद्या घटना किंवा प्रसंगाला हाताळण्यासाठी सुनिश्चित कार्यपद्धती (SOP) अंमलात आणणे गरजेचे आहे. सुरक्षा रक्षकांना कामाच्या ठिकाणी वेळोवेळी रोजच्या कामांमधून अद्ययावत स्वरूपाच्या प्रशिक्षण देण्याची गरज असल्याचे श्री. बांगर यांनी सांगितले. रूग्णांच्या सेवेला प्राधान्य देताना सुरक्षा रक्षकांसह कोणताही रूग्णालय कर्मचारी, डॉक्टर्स हे अरेरावी पद्धतीने वागणार नाहीत याचीही खातरजमा रूग्णालय प्रमुखांनी करावी. तसेच आवश्यक रूग्ण कक्षांमध्ये पुरेशी सुरक्षा व्यवस्था उपलब्ध राहील याबाबतची पडताळणी करण्याच्या सूचना त्यांनी सुरक्षा विभागाला दिल्या.
रूग्णालय परिसर हा पूर्ण सीसीटीव्ही निगराणीखाली असेल याबाबत रूग्णालय अधिष्ठातांनी स्वतः खातरजमा करून घ्यावी. तसेच संपूर्ण सीसीटीव्ही कॅमेरा नियंत्रण कक्ष निर्माण करून तो हाताळण्यासाठी २४ तास व्यक्तींची नेमणूक करण्यात यावी, अशाही सूचना त्यांनी सुरक्षा विभागाला दिल्या. या सीसीटीव्ही कव्हरेजच्या स्टोरेज व अतिरिक्त बॅकअप वेगवेगळा राहील यासाठीची व्यवस्था करावी. रूग्णालय, कॅन्टीन, कॅम्पस, कॉमन रूम, हॉस्टेल कॅम्पस, हॉस्टेल कॉमन रुम आदी परिसरात पुरेशी प्रकाशव्यवस्था करण्याच्या अनुषंगाने उपाययोजना करण्याच्या सूचना अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त श्री. बांगर यांनी प्रमुख सुरक्षा अधिकारी यांना दिल्या.
रहिवासी डॉक्टर ऑनकॉल कर्तव्यावर असतात त्यावेळी त्यांना समर्पित खोली उपलब्ध असावी. डॉक्टरांच्या कामाचे स्वरूप पाहता त्याठिकाणी नियमित स्वच्छ स्वच्छतागृहांपासून सर्व सोयी-सुविधा चांगल्या पद्धतीने उपलब्ध होतील, यासाठीची जबाबदारी रूग्णालय प्रमुखांनी घ्यावी. तसेच डॉक्टरांना भेडसावणाऱ्या अडचणी आणि समस्यांबाबत वेळोवेळी सूचना आणि प्रतिसाद घेण्यासाठीची व्यवस्था निर्माण करावी. हॉस्टेलच्या ठिकाणी देण्यात येणाऱ्या सोयीसुविधा चांगल्या दर्जाच्या राहतील, याअनुषंगाने नियमितपणे उपाययोजना करावी. तसेच नियमित बैठकांद्वारे चांगल्या संवादाने हे विषय मार्गी लावावेत, अशा सूचनाही श्री. बांगर यांनी दिल्या. येत्या दोन आठवड्यात मार्डच्या शिष्टमंडळाने केलेल्या मागण्यांवर कार्यवाही करण्याचे निर्देश श्री. बांगर यांनी दिले.
असे निदर्शनास आले आहे की, रुग्णांशी संबंधित नातेवाईकांना आया व वॉर्डबॉय यांचे काम सांगितले जाते. वास्तविक ही जबाबदारी आया व वॉर्डबॉय यांचीच आहे. अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी आया व वॉर्डबॉय यांचे नियमित कर्तव्याचा भाग असलेले काम हे त्यांनीच पार पाडणे अपेक्षित आहे. कोणत्याही परिस्थितीत ही कामे रुग्णांच्या नातेवाईकांना सांगितली जाऊ नये. तसेच रुग्णालयाच्या ठिकाणी अनुपस्थित राहणा-यांवर कडक कारवाई करण्याच्या सुचनाही त्यांनी दिल्या.
रूग्णालयात दर्जेदार पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची गरज आहे. रूग्णसेवांमध्ये गुणवत्तात्मक आणि परिणात्मक बदलाच्या माध्यमातून रूग्णांना दिलासा देणे हेच प्राधान्यस्थानी असणे गरजेचे आहे. तसेच रूग्णालयाच्या ठिकाणी योगदान देणाऱ्या डॉक्टरांना पुरविण्यात येणाऱ्या सेवासुविधाही दर्जेदार देण्यात याव्यात, असे निर्देश श्री. बांगर यांनी दिले.
आजच्या बैठकीला उपआयुक्त (सार्वजनिक आरोग्य) संजय कुऱहाडे, संचालक (वैद्यकीय शिक्षण व प्रमुख रूग्णालय) (श्रीमती) नीलम अंद्राडे, सर्व प्रमुख रूग्णालयाचे अधिष्ठाता तसेच प्रमुख सुरक्षा अधिकारी यावेळी उपस्थित होते.