मुंबई: आज राज्यभर 'मराठी भाषा दिन' साजरा होत असताना मात्र मराठी शाळेत शिक्षण झालं म्हणून मुंबई महापालिकेत नोकरी नाकारल्याचा प्रकार घडतोय. या विरोधात 150 मराठी तरुण आणि तरुणी गेले 25 दिवस आझाद मैदान, मुंबई इथे आंदोलन करीत आहेत. महाराष्ट्राच्या राजधानीतच मराठी शाळेत शिकलेल्या तरुण, तरुणींना न्याय मिळत नसेल तर मराठी भाषा दिनाचे नुसते गोडवे गाऊन काय उपयोग? असा सवाल मराठी शाळांच्या सदिच्छादूत अभिनेत्री चिन्मय सुमित यांनी मुख्यमंत्र्यांना लिहलेल्या एका पत्रात केलाय. तसेच या तरुणांना तात्काळ न्याय मिळावा अशीही मागणी केलीय.


मुंबई पब्लिक स्कूल या मुंबई महापालिकेच्या शाळाप्रकारात नोकरीसाठी उमेदवाराचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण फक्त इंग्रजी माध्यमातच असणे बंधनकारक आहे, असा 2008 साली ठराव करण्यात आलेला होता. त्या ठरावाचा आधार घेऊन या 150 तरुणांना नोकरी नाकारली आहे. हे केवळ तोंडीच सांगितलं असून तसं लेखी काही दिलं नाही. पात्र उमेदवारांना इतर उपलब्ध पर्यायातून समाविष्ट करण्यात यावे, यासाठी महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाने अनुकूलता दर्शवूनही मुंबई महापालिका त्यांना न्याय देत नाही. त्यामुळे 1 फेब्रुवारी 2021 पासून सर्व उमेदवार आझाद मैदान येथे आंदोलन करीत असून आज या आंदोलनाला 25 दिवस झालेले आहेत.


त्यामुळे या अन्यायाविरोधात आंदोलन करणाऱ्या सर्व उमेदवारांना आमचा संपूर्ण पाठिंबा असून मुंबई महानगरपालिकेच्या मुंबई पब्लिक स्कूल संबंधातला 2008 चा ठराव तात्काळ रद्द करण्यात यावा आणि या उमेदवारांना तातडीने सेवेत रुजू करून घ्यावे, अशी मराठी शाळांच्या सदिच्छादूत अभिनेत्री चिन्मयी सुमीत, मराठी अभ्यास केंद्र, मराठी एकीकरण समिती (महाराष्ट्र राज्य) आणि शिक्षक संघटना यांनी राज्य शासन आणि मुंबई महानगरपालिका यांच्याकडे एकत्रितपणे मागणी केलेली आहे.


मराठी भाषा दिनानिमित्त राज ठाकरे यांचं पत्राद्वारे आवाहन, म्हणाले...


मराठी शाळांच्या सदिच्छादूत अभिनेत्री चिन्मयी सुमीत, मराठी अभ्यास केंद्र, मराठी एकीकरण समिती (महाराष्ट्र राज्य) आणि शिक्षक संघटना यांनी मुख्यमंत्र्यांना लिहलेल्या पत्राचा मजकूर असा,


प्रति,
मा. उद्धवजी ठाकरे,
मुख्यमंत्री,
महाराष्ट्र राज्य.


विषय : मराठीतून शिक्षण झाल्यामुळे मुंबई महानगरपालिकेच्या मुंबई पब्लिक स्कूलमध्ये नोकरी नाकारली गेलेल्या उमेदवारांसंबंधी


महोदय,


बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षक भरती प्रक्रियेत नियुक्ती मिळालेल्या 150 उमेदवारांना त्यांचे 10 वी पर्यंतचे शिक्षण मराठी माध्यमात झालेले असल्यामुळे त्यांची नियुक्ती मुंबई महानगरपालिकेने रद्द केलेली आहे. पण त्याबाबतचे लेखी पत्र आजतागायत महापालिकेने दिलेले नसून नियुक्ती करता येत नाही, असे डिसेंबर 2019 ला तोंडीच सांगितले आहे. तसेच या पात्र उमेदवारांना इतर उपलब्ध पर्यायातून समाविष्ट करण्यात यावे, यासाठी महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाने अनुकूलता दर्शवूनही मुंबई महापालिका त्यांना न्याय देत नाही. त्यामुळे 1 फेब्रुवारी 2021 पासून सर्व उमेदवार आझाद मैदान येथे आंदोलन करीत असून आज या आंदोलनाला 25 दिवस झालेले आहेत.


पवित्र पोर्टलद्वारे 2017 पासून ही ऑनलाईन शिक्षक भरती प्रक्रिया सुरू झाली असून भरती प्रक्रियेच्या सर्व निकषांवर हे उमेदवार उत्तीर्ण झाले. महापालिकेकडून त्यांच्या सर्व कागदपत्रांची पडताळणी झाली. त्यानंतर जवळपास चार महिन्यांनी 'तुम्ही पालिकेच्या मुंबई पब्लिक स्कूल या शाळा प्रकाराच्या पात्रतेत बसत नसल्याने नियुक्ती देता येणार नाही' असे स्पष्टीकरण पालिकेकडून देण्यात आले. कारण मुंबई पब्लिक स्कूल या मुंबई महापालिकेच्या शाळाप्रकारात नोकरीसाठी उमेदवाराचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण फक्त इंग्रजी माध्यमातच असणे बंधनकारक आहे, असा 2008 साली ठराव करण्यात आलेला आहे.


मराठी ही महाराष्ट्राची राजभाषा असताना, बृहन्मुंबई महानगरपालिकेचा कारभार मराठीतच करणे अनिवार्य असताना आणि गेली तीस वर्ष शिवसेना या मराठीवादी पक्षाकडे मुंबई महापालिकेची सत्ता असतानाही मुंबई महापालिकेच्याच मुंबई पब्लिक स्कूल या शाळाप्रकारात नोकरीसाठी उमेदवाराचे शिक्षण फक्त इंग्रजी माध्यमातच असणे बंधनकारक करणे हे मराठी शाळांमध्ये शिकणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांचे आणि त्यांच्या पालकांचे खच्चीकरण करणारे आहे.


त्यामुळे या अन्यायाविरोधात आंदोलन करणाऱ्या सर्व उमेदवारांना आमचा संपूर्ण पाठिंबा असून मुंबई महानगरपालिकेच्या मुंबई पब्लिक स्कूल संबंधातला 2008 चा ठराव तात्काळ रद्द करण्यात यावा आणि या उमेदवारांना तातडीने सेवेत रुजू करून घ्यावे, अशी मराठी शाळांच्या सदिच्छादूत, अभिनेत्री चिन्मयी सुमीत, मराठी अभ्यास केंद्र, मराठी एकीकरण समिती (महाराष्ट्र राज्य) आणि आम्ही शिक्षक संघटना यांनी राज्य शासन आणि मुंबई महानगरपालिका यांच्याकडे एकत्रितपणे मागणी केलेली आहे.



मराठीत बोलता येत नाही तर येता कशाला? कल्याणमध्ये मनसे पदाधिकाऱ्याने आरपीएफ जवानाला फैलावर घेतलं