कल्याण : मराठीत बोलण्यास नकार देणाऱ्या आरपीएफ जवानाला मनसेने फैलावर घेतलं. मराठी येत नाही तर इथे येता कशाला, असा संतप्त मनसे पदाधिकाऱ्याने विचारला. यानंतर जवान आणि मनसे पदाधिकाऱ्यामध्ये चांगलीच जुंपली. रेल्वेच्या अन्य अधिकाऱ्यांनी हस्तक्षेप करत हा वाद सोडवला. या संपूर्ण वादाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून मनसे मराठी भाषेच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. कल्याण रेल्वे स्थानकात हा प्रकार घडला.


नेमकं काय घडलं?
रेल्वे स्टेशन परिसरात दुचाकी उभी करणाऱ्या मनसे पदाधिकाऱ्याला आरपीएफ जवानाने हमज्जाव केला. मनसे पदाधिकाऱ्याने आरपीएफ जवानाला विनंती केली, मात्र आपल्याला मराठी समजत नसून हिंदीतून बोलण्यास सांगितलं. यामुळे संतापलेल्या मनसे पदाधिकाऱ्याने या जवानाला फैलावर घेतले. महाराष्ट्रात राहायचे असेल तर मराठी आलीच पाहिजे, अन्यथा महाराष्ट्रात राहू नका, असे खडे बोल सुनावले.


कल्याण रेल्वे स्टेशन परिसरातील स्कायवाकवर धुडगूस घालणाऱ्या तृतीयपंथीय आणि गर्दुल्यामुळे प्रवाशांना त्रास होत असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी मनसेने काल आंदोलन केलं होतं. रात्री आंदोलन करण्यासाठी कल्याणमधील मनसे कार्यकर्ते स्टेशन परिसरात पोहोचले. स्टेशनजवळ दुचाकी उभी करुन आंदोलनासाठी जात असलेल्या मनसेच्या पदाधिकाऱ्याला रेल्वेच्या आरपीएफ जवानाने गाडी पार्क करण्यास मज्जाव केला. यावर मनसे पदाधिकाऱ्याने विनंती केली, मात्र या जवानाने आपल्याला मराठी समजत नसून हिंदीत बोलण्यास सांगितलं. यामुळे महाराष्ट्रात मराठीचा असा अपमान सहन करणार नसल्याचं सांगत ते आक्रमक झाले. महाराष्ट्रात राहायचे असेल तर मराठी आलीच पाहिजे अन्यथा महाराष्ट्रात राहू नका, असं सांगत मनसे पदाधिकाऱ्याने या कर्मचाऱ्याला चांगलेच फैलावर घेतलं. वाद वाढू लागल्यानंतर रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत या वादावर पडदा पाडला.


याबाबत आरपीएफचे अधिकाऱ्यांना विचारलं असता ते म्हणाले की, असे प्रकार रोजच घडतात, छोटीशी घटना होती त्यामुळे काही कारवाई केली नाही असं सांगत अधिक बोलण्यास नकार दिला. मात्र या वादाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून मनसे पुन्हा एकदा मराठीच्या मुद्द्यावर आक्रमक होत असल्याचे दिसत आहे.