काशिनाथ घाणेकर नाट्यगृहाची दुरावस्था, भरत जाधवच्या तक्रारीनंतर ठाणे मनपाचा माफीनामा
भरत जाधवच्या नाराजीनंतर ठाणे महानगरपालिकेला जाग आली. सभागृह नेते नरेश म्हस्के यांनी सर्व अधिकाऱ्यांची बैठक बोलावून एसी का दुरुस्त झाला नाही? याची विचारणाही केली.
ठाणे : ठाण्यातील काशीनाथ घाणेकर नाट्यगृहातील भोंगळ कारभार आणि दुरावस्था पाहून अभिनेता भरत जाधव चांगलाच संतापला आहे. नाट्यगृहातील वातानुकुलित यंत्रणा बंद पडली होती. त्याबाबत वारंवार सांगूनही दुर्लक्ष झाल्यामुळे भरत जाधवने संतप्त प्रतिक्रिया दिली.
भरत जाधवने याबाबतचा एक व्हिडीओ शूट करुन सोशल मीडियावर शेअर केला. व्हिडीओत भरत जाधव घामाघूम झाल्यांच दिसून येत आहे. एसी बंद असल्याची भरत जाधवची ही अवस्था झाली होती. यासंदर्भात दोन-तीन वेळा तक्रार करुनही कोणतीही दखल न घेतल्यामुळे याबाबत सोशल मीडियावर व्यक्त झाल्याचं भरत जाधवने म्हटलं आहे.
भरत जाधवच्या नाराजीनंतर ठाणे महानगरपालिकेला जाग आली. सभागृह नेते नरेश म्हस्के यांनी सर्व अधिकाऱ्यांची बैठक बोलावून एसी का दुरुस्त झाला नाही? याची विचारणाही केली. कलाकारांना झालेल्या त्रासाबद्दल त्यांनी माफीही मागितली.
"भरत जाधव यांना जो त्रास झाला त्याबद्दल ठाणे महानगरपालिका तर्फे माफी मागतो. आम्ही कलाकारांना त्रास होऊ नये याची काळजी घेतो.आम्ही आता पाहणी केली, काल देखील भरत जाधव यांच्यानंतर प्रशांत दामले यांचा शो इथे झाला, पण त्यांची काही तक्रार नव्हती. कदाचित सेट आणण्यासाठी जो दरवाजा असतो तो उघडा असेल. इथे सिलिंगच काम सुरू आहे, त्यामुळे एसी थोडी कमी असेल. ज्या समस्या आहेत त्यावर तोडगा काढायला सांगितला आहे", असं नरेश म्हस्के यांनी म्हटलं.