Sanjay Raut: शिवसेना ठाकरे गटाचे (Shiv Sena Thackeray Faction) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी ट्वीट केलेल्या व्हिडिओमुळे आता नवा राजकीय वादंग निर्माण होण्याची शक्यता दिसू लागली आहे. मराठा क्रांती मोर्चाचा (Marath Kranti Morcha) व्हिडिओ महाविकास आघाडीचा मोर्चा म्हणून शेअर केल्याप्रकरणी संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने आज शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात (Shivaji Park Police Station) तक्रार दाखल करण्यात येणार आहे. 


शनिवारी, 17 डिसेंबर रोजी महाविकास आघाडीच्यावतीने राज्यपाल आणि भाजप नेत्यांनी महापुरुषांबाबत केलेल्या अपमानास्पद वक्तव्याविरोधात मुंबईत मोर्चा काढला होता. या मोर्चाला तुरळक प्रतिसाद मिळाला असल्याचा दावा भाजप आणि शिंदे गटाकडून करण्यात आला होता. भाजपने मोर्चाला गर्दीच झाली नसल्याचा दावा करत काही फोटो शेअर केले होते. तर,  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'नॅनो मोर्चा' संबोधत विरोधकांना टोला लगावला होता. 


सत्ताधाऱ्यांकडून झालेल्या टीकेला उत्तर देताना महाविकास आघाडीने काही व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केले होते. मात्र, संजय राऊत यांनी ट्वीट केलेला व्हिडिओ हा मराठा क्रांती मोर्चाचा व्हिडिओ असल्याचा दावा करण्यात आला होता. त्यानंतर राऊत यांच्यावर टीकेची झोड उठवण्यास सुरुवात झाली.


मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने राऊत यांच्याविरोधात आज शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात येणार आहे. सकाळी 11 वाजेपर्यंत मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात तक्रार दाखल होईल. 


संजय राऊत यांचे तोंड काळे करण्याचा इशारा


संजय राऊत यांनी ट्वीट केलेल्या व्हिडिओवरून मराठा क्रांती मोर्चाचे काही पदाधिकारी चांगलेच आक्रमक झाले आहेत. मराठा समाजाची माफी मागितल्याशिवाय संजय राऊत तुम्हाला आता सोडणार नाही. तुमचं तोंड काळ केल्याशिवाय आता मराठा तरुण शांत बसणार नाहीत असा इशारा मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक अंकुश कदम यांनी दिला आहे. 


राऊत यांचे ट्वीट काय होते?


देवेंद्र फडणवीस ज्यास नॅनो मोर्चा म्हणून हिणवत आहेत तो हाच! महाराष्ट्र प्रेमी जनतेचा बुलंद आवाज. देवेंद्र जी. हे वागणे बरे नाही.जय महाराष्ट्र! असं राऊतांनी व्हिडीओ ट्वीट करत म्हटले. 







व्हिडीओवरून टीका सुरू झाल्यानंतर संजय राऊत यांनी आणखी एक ट्वीट केले. मराठा मोर्चा देखील महाराष्ट्र स्वाभिमान, न्याय्य हक्कांसाठी निघाला.शिवरायांचा जयघोष  करीत त्याच मार्गावरून त्याच ताकतीने निघाला.तेव्हा देखील आजच्याप्रमाणे विराट मोर्चाची चेष्टा दबक्या आवाजात हेच लोक करत होते.दोन्ही मोर्चे महाराष्ट्राचा स्वाभिमान दाखवणारे होते. तूर्त इतकेच! असे राऊत यांनी म्हटले. 






 


इतर महत्त्वाच्या बातम्या: