Sanjay Raut Tweet: शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज एक व्हिडीओ ट्वीट केल्यानंतर राजकारण चांगलंच तापलं आहे. कालच्या महामोर्चावरुन रंगलेल्या राजकारणानंतर फडणवीसांनी हा मोर्चा नॅनो मोर्चा असल्याचं म्हटलं. याला उत्तर देताना राऊतांनी मराठा क्रांती मोर्चाचा व्हिडीओ ट्वीट केल्याचा दावा भाजप आणि मराठा क्रांती मोर्चाकडून केला जात आहे. यावर छत्रपती संभाजीराजे यांनी ट्वीट करीत संजय राऊत यांची कानउघाडणी केली आहे. छत्रपती संभाजीराजे आपल्या ट्वीटमध्ये म्हणतात, "संजय राऊत, ज्या मोर्चाला तुम्ही मुका मोर्चा म्हणून हिणवले तोच मराठा क्रांती मोर्चा आज स्वतःच्या राजकारणासाठी वापरत आहात. या मोर्चाची चेष्टा करणारेही तुम्हीच होता. आज नसलेली ताकद दाखविण्यासाठी एकेकाळी ज्या मराठा समाजाला हिणवलं, त्यांचाच मोर्चा वापरताना जरा तरी तमा बाळगा !"






राऊतांनी केलेल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, देवेंद्र फडणवीस ज्यास नॅनो मोर्चा म्हणून हिणवत आहेत तो हाच! महाराष्ट्र प्रेमी जनतेचा बुलंद आवाज. देवेंद्र जी. हे वागणे बरे नाही.जय महाराष्ट्र! असं राऊतांनी व्हिडीओ ट्वीट करत म्हटलं आहे. या व्हिडीओवरुन टीका होऊ लागल्यानंतर राऊतांनी पुन्हा एक ट्वीट करत म्हटलं आहे की, मराठा मोर्चा देखील महाराष्ट्र स्वाभिमान, न्याय्य हक्कांसाठी निघाला.शिवरायांचा जयघोष  करीत त्याच मार्गावरून त्याच ताकतीने निघाला.तेव्हा देखील आजच्याप्रमाणे विराट मोर्चाची चेष्टा दबक्या आवाजात हेच लोक करत होते.दोन्ही मोर्चे महाराष्ट्राचा स्वाभिमान दाखवणारे होते. तूर्त इतकेच! असं राऊतांनी दुसरं ट्वीट करत म्हटलं.










मराठा क्रांती मूक मोर्चांना मूका मोर्चा म्हणून हिणवणारे हेच संजय राऊत काल मुंबईत यांनी काढलेला हल्लाबोल मोर्चा सपशेल अपयशी ठरल्याने आता स्वतःची उरली सुरली लाज राखण्यासाठी 2017 साली मराठ्यांनी मुंबईत काढलेल्या मराठा क्रांती मोर्चाचा व्हिडीओ माध्यमांमध्ये प्रसारित करुन उद्धवसेनेची न राहिलेली इज्जत वाचवण्याचा केविलवाना प्रयत्न करत आहेत, असं संजीव भोर पाटील यांनी म्हटलं आहे.  संजय राऊतांना अशी कृती करताना जराशीही लाज वाटू नये,हा तर बेशरमपणाचा कळस झाला.  शिल्लक सेनेची क्षमताच शिल्लक राहिलेली नाही हे आता सिद्ध झाले आहे.त्यामुळे त्यांनी शिंदे फडणवीस सरकारला दुषणे देण्याऐवजी आता सरळ सरळ लोटांगण घ्यावे, अशी टीका बाळासाहेबांच्या शिवसेनेचे प्रवक्ते संजीव भोर पाटील यांनी केली आहे.  


फडणवीसांनी याबाबत काय म्हटलं...
संजय राऊतांनी एक व्हिडीओ ट्वीट केला. मी त्या मोर्चाला नॅनो मोर्चा म्हटलं होतं. आज जो त्यांनी व्हिडीओ ट्वीट केला तो मराठा मोर्चाचा व्हिडीओ आहे, अशी मला माहिती मिळाली आहे. मला याबाबत काही कल्पना नाही पण असं होऊ शकतं. कारण मोठा मोर्चा नव्हता, त्यामुळं व्हिडीओ आणायचा असेल तर तो दुसऱ्या मोर्चाचाच आणावा लागेल, असा टोला फडणवीस यांनी लगावला आहे.