भिवंडी : भिवंडी महापालिकेसोबतच टोरेंट पॉवर कंपनी विरोधात विविध जनआंदोलने करणारे महाराष्ट्र निर्माण सेनेचे (MNS) भिवंडी शहराध्यक्ष मनोज गुळवी (  Manoj Gulavi) यांना पोलिसांकडून हद्दपार करण्यात आलंय. ठाणे (Thane),पालघर,बृहन्मुंबई, रायगड (Raigad) या जिल्ह्यातून दोन वर्षांकरिता हद्दपार करण्याची कारवाई भिवंडी पोलिस (Bhivandi Police) उपायुक्त यांनी केली आहे. भादवड या गावातील घरातून रविवारी (दि.18) निघताना मनोज गुळवी (  Manoj Gulavi)  यांच्या समर्थनार्थ अनेक मनसे कार्यकर्ते आणि ग्रामस्थ जमा झाले होते.त्यावेळी काहीना अश्रू अनावरही झालेले पाहायला मिळाले.


तोडफोड आणि मारहाण प्रकरणात गुन्हे 


मनसे शहर प्रमुख मनोज गुळवी यांनी टोरेंट पॉवर कंपनी विरोधात सर्वसामान्य नागरिकांना जनआंदोलनाची हाक दिल्यानंतर शहर व ग्रामीण भागातून मोठ्या संख्येने नागरिकांच्या उपस्थितीत मोर्चाचे आयोजन केले होते.तेव्हापासून मनोज गुळवी हे चर्चेत होते.परंतु, त्यानंतर साठे नगर येथील एका घटनेत टोरंट पॉवर कंपनीच्या कर्मचाऱ्यांना मारहाण प्रकरणी त्यांच्या विरोधात शासकीय कामात अडथळा आणल्याबद्दल नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून अटक केली होती. तर यापूर्वी टोरेंट पॉवर कंपनीच्या आमपाडा व नारपोली येथील कार्यालयांची तोडफोड केल्या प्रकरणी गुन्हा दाखल असून त्यासोबतच भिवंडी महानगरपालिका प्रशासनाविरुद्ध उड्डाणपुलाच्या निकृष्ट कामासंदर्भात केलेल्या आंदोलन प्रकरणी गुन्हा दाखल करून अटक केली होती.या सर्व गुन्ह्यांची पार्श्वभूमी तपासून मनसे शहराध्यक्ष मनोज गुळवी यांच्या विरोधात ठाणे, पालघर,बृहन्मुंबई, रायगड या चार जिल्ह्यातून हद्दपार करण्याची कारवाई पोलीस विभागाने प्रस्तावित केली होती.


राजकीय आकसातून केल्याचा मनोज गुळवी यांचा आरोप 


मध्यंतरी ही कारवाई थंडावली असतानाच काही दिवसांपूर्वी भिवंडी न्यायालय आवारात त्यांनी वाहन उभे करण्यावरून सुरक्षारक्षका सोबत वाद झाल्याने गुन्हा दाखल करण्यात आला  आहे. त्यानंतर पोलिस उपायुक्त श्रीकांत परोपकारी यांनी हद्दपार करण्याची कारवाई करण्याचे आदेश बजावून दोन दिवसात संबंधित चार जिल्ह्यांच्या बाहेर जाण्याचे आदेश बजावले आहेत. त्यांनतर रविवारी भादवड येथील घरातून बाहेर पडताना मनोज गुळवी यांनी आपल्यावरील कारवाई ही राजकीय आकसातून केल्याचा आरोप केला आहे.


टोरंट विरोधातील लढाई सुरुच ठेवणार 


माझ्यावरील गुन्हे हे गुन्हेगारी स्वरुपाचे नसून राजकीय आंदोलनातील आहेत. हाच न्याय लावायचा असेल तर अनेक राजकीय पक्षांच्या नेत्यांना सुध्दा तुम्ही तडीपार करणार का? असा सवाल उपस्थित करीत ,माझी टोरंट विरोधातील लढाई जनसामान्यांसाठी होती ती यापुढे ही सुरु राहणार, अशी प्रतिक्रिया मनोज गुळवी यांनी दिली आहे.


इतर महत्वाच्या बातम्या 


Amruta Pawar : भाजप नेत्या अमृता पवार यांच्यावर येवल्यात गुन्हा दाखल; म्हणाल्या, "माझ्यासह दोन शेतकरी महिलांना..."