जेलर मनिषा पोखरकर या जेलमध्ये आपली सत्ता गाजवत असत. कैद्यांना छळण्यासाठी त्या स्वत:चे तुघलकी नियम बनवत असत असंही त्यांनी कोर्टाला सांगितलं होतं. मंजुळा शेट्ये प्रकरणात मुंबई सत्र न्यायालयानं जेल अधीक्षक मनिषा पोखरकरसह 6 जणांविरोधात आरोप निश्चित केलेत. कलम 302 नुसार हत्याकरणे, कलम 120 ब नुसार हत्येचा कट रचणे, कलम 201 नुसार पुरावा नाहीसा करणे आणि कलम 501 नुसार मरेपर्यंत मारहाण करणे या कलंमांखाली हे आरोप निश्चित करण्यात आलेत.
जेल अधीक्षक मनिषा पोखरकरसह महिला जेल पोलीस बिंदू नाईकवडे, वसिमा शेख, शीतल शेगावकर, सुरेखा गुळवे आणि आरती शिंगणे या 6 जेल पोलिसांनी हेतुपुरस्कर मंजुळाची हत्या केल्याचा आरोप आरोपपत्रात ठेवण्यात आला आहे.
भायखळा जेलमध्ये महिला कैदी मंजुळा शेट्येची हत्याच झाली होती, असं क्राईम ब्रांचच्या तपासात समोर आलं असून साक्षीदार आणि वस्तूजन्य पुराव्यांच्या आधारे स्पष्ट झाल्याचे मुंबई क्राईम ब्रांचने आपल्या आरोपपत्रात नमूद केलं आहे. 23 जूनच्या रात्री मंजुळा शेट्ये या महिला कैद्याला अमानुष मारहाण करण्यात आली. यातच तिचा मृत्यू झाला.
मारहाण करणाऱ्या महिला जेल पोलीस अधिकाऱ्यांना पूर्ण कल्पना होती की, आपण जे कृत्य करतोय त्यामुळे एखादी गंभीर घटना घडू शकते. असं असतानाही मंजुळाला मारहाण करण्यात आली. तिची हत्या करण्याच्या उद्देशानेच मंजुळाला मारहाण करण्यात आली, असं आरोपपत्रात नमूद करण्यात आल्याचे क्राईम ब्रांचनं म्हटलं आहे.
एकूण 990 पानांचे हे आरोपपत्र असून यात 182 साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आले असून यात 97 कैद्यांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. यात शिना बोरा हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जीचा जबाब या आरोपपत्रात समाविष्ट करण्यात आला आहे. तर सीसीटीव्ही फुटेज हे या प्रकरणात महत्वाचा पुरावा असल्याचंही आरोपपत्रात नमूद करण्यात आले आहे.